
कोपरगाव नगरपालिकेने नागरिक व्यापारी व महिलांना स्वच्छतागृहाच्या नागरी सुविधांपासून वंचित ठेवल्याचा आरोप करत नागरिक व लोकस्वराज आंदोलनाच्या वतीने आज मंगळवारी, 11 वाजता नगरपालिका आवारात सामूहिक मूत्र विसर्जन आंदोलन करणार असल्याचा इशारा सोमवारी ॲड. नितीन पोळ यांनी दिला होता.
नगरपालिकेचा गलथान व दुर्लक्षित कारभार, नागरिकांची होणारी गैरसोय दर्शविण्यासाठी सर्वपक्षीय व नागरिकांनी पालिकेच्या आवारात सामूहिक मूत्र विसर्जन आंदोलन केले. मंगळवारी सकाळी 11 वाजता जुन्या पडलेल्या की त्या पाडलेल्या मुतारीला हार घालून आंदोलनाचा प्रारंभ झाला. यावेळी आंदोलकांच्या हातातील प्लास्टिक बाटलीत प्रतिकात्मक मूत्र होते. स्वराज्य आंदोलनाचे अध्यक्ष ॲड. नितीन पोळ व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
यावेळी लोक स्वराज आंदोलनाचे ॲड. नितीन पोळ, (उद्धव ठाकरे) शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भरत मोरे मनसेचे संतोष गंगवाल, शेतकरी कृती समितीचे तुषार विध्वंस, उमेश धुमाळ, भूमी पुत्र फाउंडेशनचे निसार शेख, भोई समाज संघटनेचे अर्जुन मोरे, शफीक सय्यद, काँग्रेसचे नितीन शिंदे, गिरीधर पवार, सुनील दवंगे, अफजल मौलाना, चंद्रशेखर आढाव, अमित खोकले, व्यापारी बांधव, नागरिक तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
परगाव शहरात मुख्य रस्त्यालगत पुरुषांसाठी स्वच्छतागृहे होती, मात्र विकासकामाच्या गदारोळात ही स्वच्छतागृहे नगरपालिकेने काढून टाकली तसेच खड्डा खोदण्याचे काम सुरू आहे. त्यात रसरंग हॉटेलजवळील मुतारी पडली की पाडली याविषयी शहानिशा करून तातडीने मुतारी बांधून द्यावी, भाजी मार्केटमध्ये अजून एखादे स्वच्छतागृह बांधावे, याबाबत अनेक व्यापारी व नागरिक यांनी वारंवार नगरपालिकेकडे स्वच्छतागृहाची मागणी केली आहे. या मागणीकडे नगरपालिका अक्षम्य दुर्लक्ष करत असून आज रोजी कोपरगाव शहरातही महिला आणि पुरुषांसाठी ठिकठिकाणी मुतारी आणि स्वच्छतागृह बांधण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
याबाबत उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदर जागेचे काम चालू असलेल्या ठेकेदारांनी तातडीने फायबरची मुतारी त्या ठिकाणी बसवून देण्याचे कबूल केले आहे. त्यानंतर मुख्याधिकारी गोसावी यांच्याशी बोलून पुढे ठेकेदार यांच्याकडून पहिल्याप्रमाणेच कायमस्वरूपी मुतारी बांधून घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.





























































