अमेरिकेचा निरोप… संपर्क वाढवा, संघर्ष नको! आखाती देशांतूनही आवाहन, शेजारधर्म पाळा

पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नसून सीमेवर अंदाधुंद गोळीबार सुरूच आहे. सलग सातव्यांदा पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यानंतर सीमेवरील गोळीबार थांबवा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा हिंदुस्थानने हॉटलाईनद्वारे पाकिस्तानला दिल्यानंतर सीमेवरील परिस्थिती आणखी चिघळली असून युद्धाची ठिणगी पडू नये म्हणून आता अमेरिकेने मध्यस्थी केली आहे. संपर्क वाढवा, संघर्ष थांबवा असा निरोपच दोन्ही देशांच्या प्रमुखांना धाडला आहे. दरम्यान, कुपवाडा, उरी आणि अखनूर येथील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार सुरू आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये दिवसेंदिवस तणाव वाढत चालला आहे. हिंदुस्थानकडून कधीही हल्ला होऊ शकतो, अशी धास्ती पाकिस्तानला लागली असून पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसीफ आणि सूचना मंत्री अताउल्लाह तरार यांनी तशी भीती बोलूनही दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर आखाती देशांनीही दोन्ही देशांशी संपर्क साधून शेजारधर्म पाळा, सबुरीने घ्या, असा सल्ला दिला आहे. तर अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यामुळे आता दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा करण्याचा इशारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

पाकिस्तानी लष्करी विमानांद्वारे वापरल्या जाणाऱ्या ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम सिग्नलला रोखण्यासाठी हिंदुस्थानने मोठे पाऊल उचलले आहे. पश्चिम सीमेवर अत्यंत प्रगत असे जॅमिंग यंत्रणा सक्रीय केली आहे.

पाकड्यांचा हल्ल्याचा कट उधळला

हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर अमृतसर येथे दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात आला. सीमा सुरक्षा दल आणि पंजाब पोलिसांनी अमृतसरमधील भारापोल गावातून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

कतार, सौदी, कुवेतला चिंता

कतार, सौदी अरेबिया आणि कुवेत या आखाती देशांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये वाढत चाललेल्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. दोन्ही देशांनी चर्चा करून आणि संयम राखून हा प्रश्न सोडवावा, असे आवाहन आखाती देशांनी केले आहे. शांततेच्या आणि चर्चेच्या मार्गाने दोन्ही देशांनी दहशतवादाचा मुद्दा सोडवावा, असे आवाहन कतारने एका निवेदनाद्वारे केले आहे.

दहशतवादाविरोधात संपूर्ण सहकार्य – अमेरिका

दोन्ही देशांतील तणाव वाढू देऊ नका, संयम राखा असे आवाहन अमेरिकेने हिंदुस्थान आणि पाकिस्तानला केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी हिंदुस्थानचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून स्वतंत्र चर्चा केली. दहशतवादाविरोधात हिंदुस्थानला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन रुबियो यांनी एस जयशंकर यांना दिले. हल्ल्याचे जे कुणी सूत्रधार आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि मृतांना न्याय मिळायला हवा असे ते म्हणाले. दक्षिण आशियात शांतता नांदावी आणि दहशतवाद मुळापासून उपटून टाकण्यासाठी हिंदुस्थान आणि पाकिस्तानने तणाव विसरून एकत्र येऊन काम करावे, तसेच हल्ल्याच्या सूत्रधारांना शिक्षा होण्यासाठी पाकिस्तानने सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी शरीफ यांना केले.

अमित शहा म्हणतात वेचून मारू, सोडणार नाही

दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊ. एकेकाला वेचून सूड घेतला जाईल. सोडणार नाही, असा इशारा केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी दिला आहे. हे मोदी सरकार आहे. हिंदुस्थानच्या इंच अन् इंच जमिनीवरून दहशतवाद मुळासकट उखडून टाकू, असेही त्यांनी म्हटले आहे.

हाफीज सईदची सुरक्षा वाढवली

2008च्या मुंबईतील बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफीज सईदला चार पट अधिक सुरक्षा पुरवली आहे. लाहोरमधील मोहल्ला जोहर टाऊन या दाट लोकवस्तीच्या निवासी भागात हाफीज सईदच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचे वृत्त आहे.