
हिंदुस्थानने 2024 पर्यंत जगातील 5 ट्रिलीयन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे; पण आखातात पेटू पाहणाऱया अमेरिका-इराण युद्धामुळे हिंदुस्थानच्या या स्वप्नांची राख होण्याची भीती आता निर्माण झाली आहे. कारण हे युद्ध पेटल्यास हिंदुस्थानला राजनैतिक, आर्थिक आणि व्यापारी क्षेत्रात 10 जबर धक्के बसणार आहेत. देशातील परदेशी गुंतवणूक घटण्यापासून ते इंधन तेल दरवाढीच्या भडक्याने 5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाचा चक्काचूर होण्याची भीती राजनैतिक आणि आर्थिक तज्ञांनी व्यक्त केली आहे.
हिंदुस्थानचे सुमारे 80 लाखांहून अधिक नागरिक पश्चिम आशियाई देशांत नोकरी, व्यवसायांच्या निमित्ताने राहत आहेत. त्यात प्रामुख्याने सौदी अरेबिया, बहारीन, कतार, कुवैत आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) या देशांत हिंदुस्थानी नागरिकांची संख्या फार मोठी आहे. एकटय़ा इराणमध्ये 4 हजार हिंदुस्थानी वास्तव्यास आहेत. इराण-अमेरिका युद्ध पेटल्यास हिंदुस्थानी नागरिकांची सुरक्षा धोक्यात येणार आहे. शिवाय ओमान व यूएई हे दोन देश हिंदुस्थानला इंधन तेल पुरवठा करणारे प्रमुख देश आहेत. युद्ध झाल्यास हा पुरवठा थांबेल आणि हिंदुस्थानात इंधन तेलाची महागाई गगनाला भिडेल अशी शक्यता आहे.
… तर हिंदुस्थानला सोसावे लागतील हे 10 झटके
इराणसह आखाती देशातून इंधन तेल पुरवठा थांबला तर हिंदुस्थानात महागाईचा आगडोंब उसळून त्याचा दुष्परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल.
आखातात युद्ध भडकल्यास इराक, सौदी अरेबिया, यूएईकडून येणारा तेलपुरवठा ठप्प होऊ शकतो.
हिंदुस्थानी शेअर बाजारात प्रचंड मंदी येऊन परदेशी गुंतवणूकदारांनी आपले शेअर्स काढून घेतल्यास शेअर बाजार प्रचंड अडचणीत येऊ शकतो.
दोन बडय़ा तेल उत्पादक देशातील युद्धामुळे जागतिक आर्थिक अस्थिरता येऊन गुंतवणूकदार सोने खरेदीकडे मोठय़ा संख्येने वळतील. त्यामुळे सोन्याचे दरही प्रचंड वाढतील.
कच्च्या इंधन तेलाचे भाव वाढल्याने महागाई वाढून जनतेच्या खिशावर त्याचा मोठा भार पडेल.
आखाती युद्ध झाल्यास आखातातील देशांत वसलेले हिंदुस्थानी पुन्हा मायदेशी परततील. त्यामुळे हे नागरिक सध्या मायदेशी पाठवत असलेल्या परकीय चलनाचा स्रोत थांबून देशाची विदेशी चलनपुंजी पार घटेल.
हिंदुस्थानचे अमेरिका व इराण या दोन्ही देशांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. उभय देशांत युद्ध झाल्यास या देशांनी होणारा हिंदुस्थानचा 100 अब्जांहून अधिक डॉलरचा व्यापार पार ठप्प होईल.
आखातातील युद्धामुळे महागाई भडकल्यास केंद्र सरकारचा खर्च वाढेल आणि उपन्न घटेल. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला प्रचंड आर्थिक त्रुटीला सामोरे जावे लागेल.
हिंदुस्थान इराणला बासमती तांदूळ आणि चहा मोठय़ा प्रमाणात निर्यात करतो. युद्धाच्या स्थितीत ही निर्यात ठप्प होऊन हिंदुस्थानला हजारो कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागेल.
अमेरिका-इराण युद्ध झाल्यास गुंतवणूक, विदेशी चलन पुंजी, इंधन तेल महागाई आणि निर्यातीतील झटक्यांमुळे हिंदुस्थानचे 5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न हे दिवास्वप्नच ठरेल.


























































