Us Israel Iran War – डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीला इराणकडून केराची टोपली; आखातातील अमेरिकन तळांवरील हल्ल्यात 15 सैनिक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक गडद होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणही इरेस पेटला आहे. इराणने कुवेतमधील अली अल सालेम हवाई तळावर ड्रोन हल्ला केला असून यात किमान 15 अमेरिकन सैनिक जखमी झाल्याचा दावा अमेरिकन मीडियाने केला आहे. दरम्यान, इराणने सौदी अरेबियाच्या पूर्व भागात सात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली.

टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तरादाखल आखाती देशांमधील अमेरिकन तळांना लक्ष्य केले आहे. अमेरिकेचे युद्धमंत्री पीट हेगसेथ यांनी मंगळवारी जाहीर केले की, आज इराणवर मोठे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांना प्रत्त्युत्तर देत इराणने कुवेत आणि सौदी अरेबियावर हल्ले केल्याचे मानले जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर मोठ्या हल्ल्याची धमकी दिल्यानंतर काही तासांतच हे हल्ले झाले आहेत.

दरम्यान, सौदी अरेबियाच्या पूर्व भागात सात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, मात्र ही क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यात आली, असे सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. या क्षेपणास्त्रांचे अवशेष वीज प्रकल्पाजवळ पडले असून संभाव्य नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे. ही क्षेपणास्त्रे कुणी डागली, याबाबत अद्याप संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले नाही.

अमेरिकन माध्यमांनी अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री कुवेतमधील अली अल सालेम हवाई तळावर झालेल्या इराणी ड्रोन हल्ल्यात किमान 15 अमेरिकन नागरिक जखमी झाले आहेत. इराणने इस्रायलवरही अनेक क्षेपणास्त्रेही डागली.