कुटुंबीयांच्या व्यावसायिक फायद्यासाठी ट्रम्प यांनी हिंदुस्थानसोबतच्या मैत्रीचा बळी दिला; अमेरिकेच्या माजी सुरक्षा सल्लागाराचा आरोप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टॅरिफमुळे जगभरातून टीका होत आहे. तसेच त्यांनी हिंदुस्थानवर लादलेल्या अतिरिक्त टॅरिफचा अनेक देशांनी विरोध केला आहे. तसेच आता अमेरिकेतूनही ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे.

‘पाकिस्तानसोबतच्या त्यांच्या कुटुंबाच्या करारासाठी ट्रम्प यांनी भारताशी असलेल्या मैत्रीचा त्याग केला…’, आता अमेरिकेच्या माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी त्यांना कोंडीत पकडले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांनी ट्रम्प यांच्यावर खळबळजनक आरोप करत त्यांनी हिंदुस्थानसोबतची मैत्री का तोडली, हिंदुस्थानवर अतिरिक्त कर का लादला, याबाबत गंभीर आरोप केले आहेत.

अमेरिकन राजदूतांचा एक संपूर्ण गट आता ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांविरुद्ध उघडपणे बोलू लागला आहे. अमेरिकन गुप्तचरांना आश्चर्य वाटते की, ज्या हिंदुस्थानने अमेरिकेला वर्षानुवर्षे राजनैतिक प्रयत्नांनंतर चीनविरुद्ध एक शक्ती म्हणून उभे केले, तोच हिंदुस्थान आता अमेरिकन धोरणांमुळे उघडपणे चीन आणि रशियाशी मैत्री करत आहे. याबाबत अमेरिकेत चिंता व्यक्त होत असून ट्रम्प यांचे टॅरिफ धोरणामुळे हिंदुस्थान अमेरिकेपासून दुरावत असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांचे हिंदुस्थानबाबतचे टॅरिफ धोरण अमेरिकेच्या व्यावसायिक हितसंबंधांशी संबंधित नाही, तर ट्रम्प यांचे वैयक्तिक हितसंबंध त्यामागे आहेत. अमेरिकन प्रशासनातील अनुभवी राजनयिकांनी आता ट्रम्पच्या हेतूंवर स्पष्टपणे बोलायला सुरुवात केली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानमध्ये त्यांच्या कुटुंबाच्या व्यावसायिक करारांना चालना देण्यासाठी हिंदुस्थानशी असलेल्या मैत्रीचा बळी दिला. त्यांच्या या आरोपांची जगभरात चर्चा होत आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वकील सुलिव्हन एका यूट्यूब चॅनेलवर मुलाखतादरम्यान हे आरोप केले आहेत. सुलिव्हन म्हणाले, अमेरिकेने अनेक दशकांपासून, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या हिंदुस्थानशी संबंध मजबूत करण्यासाठी काम केले आहे. ज्या देशासोबत आपण तंत्रज्ञान, प्रतिभा, अर्थशास्त्र आणि चीनच्या धोरणात्मक प्रवृत्तीचा सामना करण्यासाठी एकत्र आले पाहिजे. या आघाडीवर लक्षणीय प्रगती झाली आहे. मात्र, आता ट्रम्प कुटुंबाच्या स्वार्थामुळे हिंदुस्थान-अमेरिका संबंध दुरावले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

आता ट्रम्प यांनी हिंदुस्थानकडे दुर्लक्ष आहेत कारण ट्रम्प कुटुंबाला पाकिस्तानशी व्यावसायिक करार करण्याची इच्छा आहे. पाकिस्तानने ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केलेच. तसेच त्यांच्या कुटुंबियांना आणि जवळच्या लोकांना त्यांच्या नवीन पाकिस्तान क्रिप्टो कौन्सिलमध्ये समाविष्ट केले. पहलगाम हल्ल्यानंतर काही दिवसांनीच, ट्रम्प कुटुंबाच्या पाठिंब्याने वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियलने पाकिस्तान क्रिप्टो कौन्सिलशी करार केला. सुलिव्हनसह अनेक तज्ञांनी पाकिस्तानी व्यवसायात ट्रम्प कुटुंबाचा सहभाग त्यांच्या पाकिस्तानी हितसंबंधांशी जोडला आहे.

सुलिव्हन म्हणाले, हिंदुस्थानसोबत जे घडत आहे त्याचा जगभरातील आमच्या सर्व संबंधांवर आणि भागीदारीवर थेट आणि व्यापक परिणाम होईल. ट्रम्पच्या धोरणांमुळे हिंदुस्थानला पुन्हा एकदा रशियन बाजूने जाण्यास भाग पाडले आहे. ते म्हणाले की, पश्चिमेकडील देशांनी शीतयुद्धातील सोव्हिएत युनियन/रशियाशी असलेल्या संबंधांपासून हिंदुस्थानला दूर ठेवण्याचा अनेक दशकांपासून प्रयत्न केला आहे आणि चीनकडून निर्माण होणाऱ्या धोक्याबद्दल हिंदुस्थानला इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या विनाशकारी टॅरिफ धोरणाने दशकांपासून केलेले प्रयत्न उध्वस्त केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.