Israel Iran War – ट्रम्प यांची पोस्ट, इराणचा इन्कार; वादात शेअर बाजाराचा 3 ट्रिलियन डॉलर्सचा खेळ खल्लास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोमवार २३ मार्च, २०२६ हा शेअर बाजाराच्या इतिहासात गुंतवणूकदारांचा श्वास रोखून धरणारा थरारक दिवस ठरला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका सोशल मीडिया पोस्टनंतर इराणने तात्काळ दिलेल्या नकाराने, वॉल स्ट्रीटवर अवघ्या ५६ मिनिटांत ३ ट्रिलियन डॉलर्सची प्रचंड उलथापालथ झाली ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये अंदाजे २८० लाख कोटी रुपये इतकी प्रंचड आहे. हा प्रचंड ‘खेळ’ एका तासापेक्षा कमी वेळात उलगडला. आता या आकडेवारीमुळे ही अमेरिकेतील बाजारातील हेराफेरी असल्याची चर्चा आहे.

ट्रम्प यांच्या पोस्टनंतर बाजार भांडवल २ ट्रिलियन डॉलर्सने वाढले, तर इराणच्या नकाराने बाजार भांडवलातून १ ट्रिलियन डॉलर्स कमी झाले. त्यामुळे अवघ्या 56 मिनिटांत बाजारात ३ ट्रिलियन डॉलर्स स्वाहा झाले. तज्ज्ञ याकडे बाजारातील हेराफेरी म्हणून बघत आहेत.

या खेळाची सुरुवात अमेरिकेत सकाळी ७:०४ वाजता (ET) झाली, जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दावा केला की युद्ध संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांनी जाहीर केले की इराणच्या ऊर्जा केंद्रांवरील हल्ले पुढील पाच दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहेत.

या बातमीने युद्धाच्या परिणामांनी आधीच त्रस्त असलेल्या बाजारांमध्ये आशेची लाट आणली. अवघ्या सहा मिनिटांत, सकाळी ७:१० वाजता (ET), एस अँड पी ५०० निर्देशांक २४० अंकांनी वाढला. या तेजीमुळे बाजाराचे एकूण भांडवल तब्बल २ ट्रिलियन डॉलर्सने वाढले. कच्च्या तेलाच्या किमती, ज्या सुमारे १२० डॉलर्स होत्या, त्या अचानक १०० डॉलर्सच्या खाली घसरल्या.

बाजारात अजूनही जल्लोष सुरू असतानाच २७ मिनिटांनी इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले. इराणचे परराष्ट्र मंत्रालय आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी ट्रम्प यांचे दावे बनावट बातम्या असल्याचे सांगून पूर्णपणे फेटाळून लावले. इराणने स्पष्टपणे सांगितले की अमेरिकेशी कोणताही संपर्क झालेला नाही, तसेच कोणतीही चर्चा सुरू नाही. इराणच्या कठोर भूमिकेने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास डळमळीत झाला. ईटी वेळेनुसार सकाळी ८:०० वाजेपर्यंत, एस अँड पी ५०० निर्देशांकातील वाढ निम्मी झाली होती. हा निर्देशांक १२० अंकांनी घसरला, ज्यामुळे अल्पावधीतच बाजार भांडवलातील १ ट्रिलियन डॉलर्सची घट झाली.

तज्ज्ञ या घडामोडीला अभूतपूर्व म्हणत आहेत. एका तासापेक्षा कमी वेळेत झालेला ३ ट्रिलियन डॉलर्सचा हा चढ-उतार, भू-राजकीय तणाव आणि सोशल मीडियाच्या युगात बाजारपेठ किती संवेदनशील झाली आहे हे दर्शवतो. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांचे धोरण दबावाद्वारे शांतता हे असले तरी, इराण याला बाजारपेठेत हेराफेरी करण्याचा अमेरिकेचा डाव म्हणत आहे. सध्या, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तणाव कायम आहे आणि गुंतवणूकदार आता कोणत्याही अधिकृत निवेदनावर विश्वास ठेवण्यापूर्वी दोनदा विचार करत आहेत.