ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या अमेरिकेच्या हालचाली, अमेरिकी संसदेत विधेयक सादर

निकोलस मादुरो यांना अटक करून व्हेनेझुएलाचा कारभार हाती घेतल्यानंतर अमेरिकेने आता ग्रीनलँड ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने आज तसे विधेयकच अमेरिकी संसदेत सादर केले. अमेरिकेच्या या विस्तारवादी भूमिकेमुळे जगभरात चिंता व्यक्त होत आहे.

रिपब्लिकन पक्षाचे खासदार रँडी फाइन यांनी हे विधेयक मांडले. ग्रीनलँड हा देश अमेरिकेत विलीन करून त्याला अमेरिकेचे राज्य म्हणून दर्जा देण्याची तरतूद या विधेयकात आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास अमेरिका सरकारला त्यादृष्टीने कारवाई करण्याचे अधिकार मिळणार आहेत. तसे झाल्यास ग्रीनलँड हे अमेरिकेचे 51 वे राज्य ठरणार आहे.

चीन, रशियाला रोखण्याचा हाच उपाय

‘अमेरिकेचे हितशत्रू आसपासच्या प्रदेशात हातपाय पसरण्याच्या प्रयत्नात आहेत. ते अमेरिकेला परवडणारे नाही. ग्रीनलँडच्या प्रदेशात रशिया आणि चीनच्या वाढत्या वर्चस्वाला लगाम घालण्यासाठी ग्रीनलँड ताब्यात घेणे हाच उपाय आहे,’ असे फाइन यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे.