
हिंदुस्थानच्या नौदलाची ताकद आता वाढली आहे. नौदलाने ‘MH-60R’ (रोमियो) या बहुकार्यप्रवण असलेल्या दोन हेलिकॉप्टरची पहिली तुकडी अमेरिकेच्या नौदलाकडून सॅन दिएगो येथे नॉर्थ आयलंडवरील नौदलाच्या तळावर समारंभपूर्वक स्वीकारली. या समारंभाद्वारे या हेलिकॉप्टरचे अमेरिकी नौदलाकडून हिंदुस्थानी नौदलाकडे अधिकृत हस्तांतरण झाले.
हिंदुस्थानचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी नौदलाच्या वतीने ही हेलिकॉप्टर्स स्वीकारली. या समारंभात अमेरिकी नौदलाच्या हवाई दलाचे कमांडर वाईस ऍडमिरल केनेथ व्हिटसेल यांनी या हेलिकॉप्टरची कागदपत्रे हिंदुस्थानी नौदलाचे उपनौदलप्रमुख वाईस ऍडमिरल रवनीत सिंग यांच्याकडे सुपूर्द केली.
The two MH-60 Romeo helicopters were received by the Indian Ambassador to the United States, Taranjit Singh Sandhu and Indian Navy Deputy Chief Vice Admiral Ravneet Singh at the US Navy base in San Diego pic.twitter.com/PdBSTtNTOW
— ANI (@ANI) July 17, 2021
MH-60R या हेलिकॉप्टर्सचे उत्पादन लॉकहीड मार्टीन कॉर्पोरेशन या अमेरिकी कंपनीने केले असून सर्व प्रकारच्या हवामानात विविध प्रकारच्या मोहिमांमध्ये काम करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक एवियॉनिक्स/सेन्सर्सचा वापर करून त्यांची रचना करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या 24 हेलिकॉप्टर्सची खरेदी अमेरिकेकडून करण्यात येत आहे.
या हेलिकॉप्टरमध्ये विविध प्रकारची हिंदुस्थानी सामग्री आणि शस्त्रे बसवण्यासाठी सुधारणा देखील करण्यात येणार आहे. MH-60r या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे हिंदुस्थानी नौदलाच्या त्रिमितीय क्षमतेत आणखी वाढ होणार आहे. या हेलिकॉप्टरचा त्यांच्या क्षमतेनुसार वापर करता यावा यासाठी कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे सध्या अमेरिकेत प्रशिक्षण सुरू आहे.
MH-60R या हेलिकॉप्टरचा सर्वाधिक वेग 267 किलोमीटर प्रति तास आहे. हे हेलिकॉप्टर एकाचवेळी 834 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. तसेच याचे वजन 6 हजार 895 किलोग्राम असून याची क्षमता 10 हजार 659 किलोग्राम वजन नेण्याची आहे. हिंदुस्थानसह ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, डेन्मार्क, सौदी अरब यांच्याकडेही हे हेलिकॉप्टर आहे.





























































