अमेरिकन ओपन टेनिस; सेरेनाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने सोमवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत 15व्या सीडेड मारिया सक्कारी हिचे कडवे आव्हान 6-3, 6-7, 6-3 अशा फरकाने दोन तास व 28 मिनिटांमध्ये परतावून लावले आणि अमेरिकन टेनिस ग्रॅण्डस्लॅमधील महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सेरेना विल्यम्सला 24वे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद खुणावत असून ही स्पर्धा जिंकल्यास मार्गरेट कोर्ट हिच्या 24 ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाच्या विक्रमाची बरोबरी तिला करता येणार आहे. सेरेना विल्यम्सला पुढील फेरीत स्वेताना पिरोनकोवा हिचा सामना करावा लागणार आहे. स्वेताना पिरोनकोवा हिने फ्रान्सच्या एलीझ कॉर्नेटला 6-4, 6-7, 6-3 असे हरवले आणि कूच केले.

थिम भिडणार ऍलेक्सला

ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिम याने कॅनडाच्या फेलिक्स अगर याचा 7-6, 6-1, 6-1 असा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवला आणि अंतिम आठमध्ये दिमाखात प्रवेश केला. यंदाच्या अमेरिकन दौऱयावरील हा सर्वोत्तम विजय असल्याचे यावेळी डॉमिनिक थिमने सांगितले. सेमी फायनलला पोहचण्याआधी डॉमिनिक थिमला ऍलेक्स दी मिनॉरचा अडथळा असणार आहे. ऍलेक्स दी मिनॉर याने कॅनडाच्या वॅसेक पॉसपिसील याला 7-6, 6-3, 6-2 असे नमवले.

हिंदुस्थानचे आव्हान संपुष्टात

अमेरिकन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील हिंदुस्थानचे आव्हान सोमवारी मध्यरात्री संपुष्टात आले. रोहन बोपण्णा व त्याचा साथीदार डेनिस शॅपोवालोव याला पुरुष दुहेरीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. नेदरलॅण्डचा जीन ज्युलियन रोजर व रोमानियाचा होरिया तेकाऊ या जोडीकडून रोहन बोपण्णा – डेनिस शॅपोवालोव या जोडीला 5-7, 5-7 अशा फरकाने हार पत्करावी लागली.