मोफत विमान पकडा, पण अमेरिका सोडा; देशाच्या इतिहासात पहिल्यांदा सुरू केला स्व-निर्वासन कार्यक्रम

मोफत विमान पकडा, परंतु अमेरिका सोडा अशी ऑफर देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्व-निर्वासन कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमांतर्गत अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱया स्थलांतरितांना मोफत विमान तिकिटे आणि प्रोत्साहन रक्कम देऊन स्वेच्छेने त्यांच्या देशात परत जाण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
जे बेकायदा स्थलांतरित त्यांच्या मायदेशात जाण्याचा निर्णय घेतील त्यांना 1000 अमेरिकन डॉलर्स इतकी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या विमान प्रवासाचा खर्चही अमेरिकन प्रशासन देणार आहे.

…अन्यथा ही कारवाई होणार
स्वेच्छेने अमेरिका सोडणार नाहीत त्यांना मोठा आर्थिक दंड, मालमत्ता जप्त करणे, वेतन जप्त करणे, तुरुंगवास आणि आम्ही ठरवू त्या ठिकाणी आणि आम्ही ठरवू त्या पद्धतीने अचानक हद्दपारी करण्यात येईल, असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे. होमलॅण्ड सिक्युरिटी विभाग एक कार्यक्रम सुरू करणार आहे. जे बेकायदेशीर स्थलांतरित माघारी जातील त्यांची सीबीपी अॅपद्वारे पुष्टी झाल्यानंतर त्यांच्या खात्यात एक हजार अमेरिकन डॉलर्स आर्थिक मदत म्हणून पाठवले जातील़.