
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी रोजच्या रोज धमक्या आणि डेडलाइन देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणने आज जोरदार दणका दिला. ट्रम्प यांचा युद्धबंदीचा प्रस्ताव इराणने धुडकावून लावला. ‘होर्मुझची चावी हरवली आहे,’ अशा शब्दांत ट्रम्प यांची खिल्ली उडवली.
ट्रम्प यांनी इराणला पुन्हा अल्टिमेटम देत मंगळवार रात्री 8 वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. या वेळेपर्यंत होर्मुझ खुली न केल्यास इराणचा नरक बनवून टाकू. ऊर्जा प्रकल्प आणि पूल उडवून देऊ, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. तसेच इराण चर्चेला तयार होईल, अशी दर्पोक्तीही ट्रम्प यांनी केली होती. मात्र, इराणने आज त्यांच्या इशाऱ्यातील हवाच काढून टाकली.
झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेतील इराणी दूतावासांनी ‘एक्स’वर एका मागोमाग एक पोस्ट केल्या. ‘होर्मुझची चावी हरवली’ असे ट्विट झिम्बाब्वे येथील दूतावासाने केले. तर ‘शू।़।़ होर्मुझची चावी फुलदाणीच्या खाली ठेवली आहे. ती फक्त मित्रांसाठी बाहेर काढली जाईल,’ अशी खोचक पोस्ट दक्षिण आफ्रिकेतील दूतावासाने केली.
हायफा शहरावर इराणचा हल्ला
इस्रायलचे प्रमुख बंदर असलेल्या हायफा शहरात इराणने केलेल्या ड्रोनहल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही जखमी झाले आहेत. हायफातील तेल रिफायनरीला लक्ष्य करून इराणने ड्रोन डागले होते. हे ड्रोन एका निवासी इमारतीवर कोसळले. यात इमारतीचेही मोठे नुकसान झाले.

























































