ऑपरेशन करतेवेळी डॉक्टर निळ्या किंवा हिरव्या रंगाचाच युनिफॉर्म का घालतात ?

डॉक्टर आणि सफेद रंग हे तसं आपल्या ओळखीचं समीकरण आहे. चित्रपटात किंवा रुग्णालयात आपल्याला डॉक्टर नेहमीच सफेद रंगाच्या कोटमध्ये दिसतात. पण ऑपरेशनला जाताना मात्र डॉक्टर सफेद रंगाऐवजी कधी हिरव्या तर कधी निळ्या रंगाच्या युनिफॉर्ममध्ये दिसतात. त्यांच्या या दोन रंगांच्या युनिफॉर्ममागचं कारण आपण जाणून घेऊया.

डॉक्टरांनी सफेद रंगाचा युनिफॉर्म घालणं हा पूर्वीपासूनचा नियम आहे. सफेद रंग हा शांततेचे व स्वच्छतेचे प्रतिक आहे. यामुळे विविध प्रकारचे रुग्ण हाताळताना डॉक्टरांना मानसिक ताण येऊ नये. शांत वाटावे म्हणून डॉक्टर सफेद रंगाचा कोट घालतात. पण 1914 साली एका डॉक्टरने सफेद रंगाच्या या डॉक्टरांच्या युनिफॉर्मचा रंगच बदलून हिरवा करुन टाकला. तर काही डॉक्टरांनी हिरव्याला निळ्याचीही जोड दिली. यामुळे तेव्हापासून डॉक्टर ऑपरेशन करतेवेळी हिरव्या तर कधी निळ्या रंगाच्या युनिफॉर्मचा वापर करू लागले.

1998 साली प्रसिद्ध झालेल्या ‘टूडे सर्जिकल नर्स’ या वैद्यकिय अहवालात यावर लेख लिहण्यात आला होता. त्यानुसार हिरवा रंग हा डोळ्यांना आराम देणारा असल्याने डॉक्टरांनी ऑपरेशन करताना या रंगाचा युनिफॉर्म घालण्याचे ठरवले. जर आपण एखाद्या गडद रंगाकडे एकटक पाहीले तर डोळ्यांना त्रास होतो. डोळे थकतात. कधी कधी डोळ्यांना सूजही येते. यामुळे वैद्यानिक दृष्टीकोणातून विचार करता आपले डोळे हिरवा आणि निळा रंग बघण्यासाठी अधिक सक्षम आहेत. यामुळे ऑपरेशन करतेवेळी रक्ताचा लालभडक रंग सतत बघून डॉक्टरांच्याही डोळ्यांवर ताण येतो. अशावेळी आजूबाजूला डोळ्याला आराम देणारा रंग दिसल्यास थकवा जाणवत नाही. म्हणूनच हिरव्या आणि निळ्या रंगाचा युनिफॉर्म घालणे डॉक्टर पसंत करू लागल्याचे या लेखात सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या