
अमेरिकेतील कोरोना लसीच्या संशोधनात खोडा घालण्याचा कट चीन आणि रशियाने रचला आहे. हे दोन्ही देश सध्या लसीच्या संशोधनातील महत्त्वाची माहिती चोरण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी दोन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणा चांगल्याच कामाला लागल्या आहेत. अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणेने हा दावा केला आहे.
अमेरिकेत फायजर तसेच आणखी काही कंपन्या कोरोना लस तयार करत आहेत. नॉर्थ कॅरोलिना यूनिव्हर्सिटीबरोबरच इतर अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये संशोधनाचे कार्य सुरू आहे. जगातील सर्वच विकसित देश परस्परांच्या लस संशोधन कार्याचा आढावा घेत आहेत. यासाठी गुप्तचर यंत्रणांची मदत घेतली जात आहे. अशातच चीनने रशियाच्या संगनमतातून अमेरिकेच्या लसीची संवेदनशील माहिती चोरण्याचा कट आखला आहे. दरम्यान, एफबीआयने आतापर्यंत चीनचा प्रत्येक मनसुबा उधळून लावला आहे.


























































