
सामना ऑनलाईन । सीडनी
ऑलिम्पिकमध्ये धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदकांचा रतीब लावणारा वेगाचा राजा, विक्रमवीर उसेन बोल्ट याने फुटबॉलमध्ये पदार्पण केले आहे. पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात बोल्टने दुहेरी धमाका करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. बालपणापासून व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून मैदानात उतरण्याचे स्वप्न पूर्ण करत बोल्टने पहिल्या सामन्यात दोन गोले केले आणि संपूर्ण जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले.
शुक्रवारी मॅकार्थर साऊथ वेस्ट युनायटेड आणि सेंट्रल कोस्ट मरिनर्स संघात एक मैत्रीपूर्ण सामना खेळला गेला. या सामन्यात बोल्टने 57 व्या आणि 68 व्या मिनिटाला गोल करत फुटॉबलमधील सुरुवात झोकात केली आहे. बोल्टच्या या गोलच्या बळावर सेंट्रल कोस्ट मरिनर्स संघाने मोठा विजय मिळवला. या सामन्यात बोल्टसह रोस मॅकोरनमॅक आणि जॉर्डन मरेनेही गोल केले.
तेव्हा बदली खेळाडू…
यापूर्वी बोल्टला ऑगस्टमध्ये एका सामन्यात बदली खेळा़डू म्हणून मैदानात उतरण्याची संधी मिळाली होती. परंतु आजच्या सामन्यातून त्याचे खऱ्या अर्थाने व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून पदार्पण झाले असे म्हणावे लागेल.

























































