
>>आशिष बनसोडे
यंदाच्या बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृहात बकरा मंडीला सुरुवात झाली आहे. विविध राज्यांतून बकऱ्या तसेच म्हशी या मंडीत मोठय़ा संख्येने दाखल होऊ लागल्या आहेत. कोटय़वधींची उलाढाल होणाऱ्या या मंडीत बकऱ्या, मोबाईल चोरी होऊ नये, आगीसारखी दुर्घटना घडू नये याकरिता पोलिसांबरोबर महापालिकेने जोरदार तयारी केली आहे. यंदा प्रथमच विशिष्ट रंगाचा होलोग्राम असलेला बारकोड पास आणि एआयचा सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येत आहे.
देवनार पशुवधगृहात 26 मेपासून बकरा मंडीचे आयोजन केले आहे.यासाठी विविध राज्यांतून बकऱ्या आणि म्हशी येऊ लागल्या आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता तगडा पोलीस बंदोबस्त आहे. शिवाय पालिका प्रशासनाकडून डिजिटल बारकोड असलेले पासेस बकरी व्यापाऱ्यांना दिले आहेत. या बारकोडला ‘पेस्टल ग्रीन’ रंगाचा होलोग्राम लावला आहे. या रंगामुळे कोणालाही बनावट बारकोड असलेला बकरा विक्रीचा पास बनवता येणार नाही. जरी त्या पासची रंगीत झेरॉक्स काढली तरी गेटवरती तो पास स्पॅन होणार नाही. अशा प्रकारे बनावट पासद्वारे बकरा चोरीचा प्रयत्न हाणून पाडणे शक्य होणार असल्याचे अधिकारी येरोलकर यांनी सांगितले.
50 सीसीटीव्ही, एआय सॉफ्टवेअर
पशुवधगृहात उभारलेल्या नियंत्रण कक्षात एआय सॉफ्टवेअरला तेथील 50 सीसीटीव्ही कॅमेरे जोडले आहेत. परिणामी कुठेही आग लागत असल्यास पॅमेरातील फुटेजमधून ते सॉफ्टवेअर पटकन कैद करून तसा अलार्म देणार. त्यामुळे अधिकारी तत्काळ अलर्ट होऊन आगीवर वेळीच नियंत्रण मिळवतील. पहिल्यांदाच प्रायोगिक तत्त्वावर हे एआय सॉफ्टवेअर वापरण्यात येणार आहे.
पोलिसांची करडी नजर
मंडीतून बकरा तसेच व्यापारी व ग्राहकांचे मोबाईल, पैसे चोरी होऊ नये याकरिता पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे. पशुवधगृहाच्या 13 गेटच्या ठिकाणी पोलीस असून आतमध्ये नियंत्रण व सहाय्यता कक्ष, वॉच टॉवर उभारले आहेत. वर्दीतील तसेच सिव्हिल ड्रेसमधील पोलिसांची सतत गस्त ठेवण्यात आली आहे. काहीही संशयास्पद दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.
महिनाभर चालणारी बकरा मंडी सुरक्षित पार पडावी याकरिता सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यंदा सुरक्षेच्या दृष्टीने नवीन प्रयोगदेखील केले जात आहेत. ग्राहक व व्यापाऱ्यांनी सहकार्याची भूमिका बजवावी.
– कलिमपाशा पठाण, व्यवस्थापक (देवनार पशुवधगृह)