दुधाचा असाही उपयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सामना टीम

दूध नासले की साधारणपणे ते फेकून दिले जाते. अगदीच त्याचा उपयोग करून घ्यायचा म्हटलं तर त्यापासून पनीर बनवता येते. पण याच नासलेल्या दुधाचे आरोग्याच्या दृष्टीने बरेच फायदे आहेत. एकूणच दूध कसेही म्हणजे कच्चे असो, उकळवलेले असो की चक्क नासलेले असो, त्यात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. पण ते नासले तर त्याची चव बिघडते. म्हणून ते पिण्यायोग्य राहात नाही. म्हणूनच नासलेल्या दुधाचे स्वास्थ्याच्या दृष्टीने फायदे जाणून घेतले पाहिजेत.

– फाटलेल्या दुधाचा शरीरासाठी सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. या दुधातील पाण्यात खूप मोठय़ा प्रमाणात प्रथिने असतात. हे पाणी प्यायल्याने स्नायूंची ताकद तर वाढतेच, पण त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती प्रचंड वाढते. या पाण्यामुळे रोगांशी लढण्याची ताकद शरीराला मिळते.

– कोणत्याही प्रकारचा रक्तदाब असलेल्या रुग्णांनी नासलेल्या दुधाचे पाणी प्यायला हवे. त्यामुळे रक्तदाब बरा होतो.

– नासलेल्या दुधामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहाते, हे आतापर्यंत अनेकदा केलेल्या संशोधनांतून समोर आले आहे.

– जेवणाचा स्वाद वाढवण्याची अजब करामत नासलेले दूध करू शकते. म्हणजे पोळ्या करताना कणिक भिजवता तेव्हा त्यात नासलेल्या दुधातील थोडे पाणी घातले तर पोळ्या मऊसूत आणि नरम होतात आणि स्वादही अप्रतिम लागतो. कणकेमध्ये हे पाणी मिसळून वेगवेगळे पदार्थही करता येतात. या सर्वच पदार्थांची चव खूपच छान लागते.

– चेहरा चमकदार व्हावा असं सर्वांनाच वाटतं. दुधामुळे चेहऱयातील स्नायूंमध्ये रक्तसंचार चांगला वाढतो हेही सर्वांना ठाऊक आहे. पण जर दूध नासलेले असेल तर या नासलेल्या दुधात बेसनाचे पीठ, हळद आणि चंदन सर्व थोडे थोडे घेऊन त्याचे मिश्रण करून ते चेहऱयाला लावा. चेहरा चमकदार होईल.