
जगातील सर्वात लोकप्रिय ई-मेल प्लॅटफॉर्म ‘जी-मेल’च्या कोटय़वधी युजर्सना दिलासा मिळणार आहे. गुगल लवकरच एक असे फीचर लॉन्च करणार आहे, ज्याची गेल्या दोन दशकांपासून वाट पाहिली जात होती. गुगलचे युजर्स आता त्यांच जुने ई-मेल अॅड्रेस (@gmedailed.comed) बदलू शकतील. विशेष बाब म्हणजे यासाठी त्यांना नवीन खाते तयार करण्याची गरज भासणार नाही आणि त्यांचा जुना डेटादेखील डिलीट होणार नाही.
गुगलच्या एका सपोर्ट पेजद्वारे या नवीन अपडेटची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत नियम असा होता की, एकदा तयार केलेला ई-मेल अॅड्रेस बदलता येत नव्हता. जर कोणाला नवीन अॅड्रेस हवा असेल, तर त्याला नवीन खाते तयार करून आपला संपूर्ण डेटा (संपर्क, पह्टो, ड्राइव्ह फाइल्स) मॅन्युअली ट्रान्सफर करावा लागत असे. मात्र आता जुना अॅड्रेस पूर्णपणे नष्ट होणार नाही.
वर्षातून फक्त एकदाच
गुगलने या फीचरसोबत काही अटीही ठेवल्या आहेत, जेणेकरून त्याचा गैरवापर होऊ नये. सपोर्ट डॉक्युमेंटनुसार, एक वापरकर्ता वर्षातून फक्त एकदाच आपला जी-मेल पत्ता बदलू शकेल. संपूर्ण आयुष्यात एका खात्यासाठी जास्तीत जास्त तीन वेळाच पत्ता बदलण्याची परवानगी दिली जाईल. म्हणजेच एका खात्याशी एकूण 4 अॅड्रेस लिंक केले जाऊ शकतात.

























































