
क्रिकेट हा केवळ धावा आणि आकडे यांचा खेळ नसतो, तर तो स्वप्नांचा, संघर्षांचा आणि ओळखीचा प्रवास असतो. उस्मान ख्वाजाने सिडनीत खेळल्या जाणाऱया पाचव्या अॅशेस कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आणि हा प्रवास आता भावुक वळणावर येऊन थांबणार आहे. एससीजीवरील त्याची अखेरची कसोटी केवळ एक सामना नसून एका युगाचा शेवट ठरणार आहे. 87 कसोटी सामने, 6206 धावा, 43.39 ची सरासरी आणि 16 शतके हे आकडे उस्मान ख्वाजाच्या कसोटी कारकीर्दीची साक्ष देतात. इंग्लंडविरुद्धचा सिडनी कसोटी सामना हा त्यांच्या आयुष्यातील 88 वा आणि शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल, हे त्याने आज जाहीर केले.
चढउतारांनी भरलेली 15 वर्षांची वाटचाल
‘माझा प्रवास इतरांपेक्षा वेगळा होता. आज मनातल्या सगळ्या भावना बाहेर आल्या,’ असे तो म्हणाले. इस्लामाबादमध्ये जन्मलेला उस्मान ख्वाजा लहानपणी कुटुंबासह ऑस्ट्रेलियात आला. सिडनीत वाढताना एससीजीवर सामने पाहत त्याने क्रिकेटची स्वप्ने रंगवली. पुढे याच मैदानावर त्याने प्रथम श्रेणी आणि कसोटी पदार्पण केले. भावुक क्षणी तो म्हणाला, ‘मी पाकिस्तानमधून आलेला एक अभिमानी, रंगवर्णाचा मुस्लिम मुलगा आहे. मला कधीच ऑस्ट्रेलियासाठी खेळता येणार नाही, असं सांगितलं गेलं होतं आणि आज मी इथे उभा आहे.’































































