
वाहतुकीच्यादृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला उटंबर केळशी रस्ता आतगाव हद्दीतील देवशेत नावाच्या स्थानिक ठिकाणी एका बाजूने ढासळला आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. वाहतुक सुरळीत आणि विना अपघात होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
दापोली तालूक्यातील आडे उटंबर केळशी मांदिवलीकडून मंडणगड तालूक्याकडे जाणारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितीतील महत्वाचा रस्ता आतगाव हद्दीत देवशेत या स्थानिक नाव असलेल्या ठिकाणी एका अवघड वळणाच्या आधी सुनिल मोरे यांच्या शेतीकडील भाग ढासळला आहे त्यामुळे या ठिकाणाहून वाहन चालकांना आपल्या ताब्यातील वाहने हाकने धोक्याचे झाले आहे.
आडे उटंबर केळशी मांदिवली हा मार्ग वाहतुकीच्यादृष्टीने अतिषय महत्वाचा असा मार्ग आहे. या मार्गावर एस.टी. बसेससह चारचाकी, तिन चाकी, दुचाकी वाहने तसेच अवजड वाहनांची कायमच वर्दळ असते. केळशी हे गाव एक व्यापारी बाजारपेठ असल्याने तसेच विविध वित्तिय संस्था, पोस्ट ऑफिस, प्राथमिक आरोग्य केंद्र, खाजगी दवाखाने, पशुवैदयकिय दवाखाने हायस्कुल यामुळे या मार्गाला एक वेगळेच महत्व आहे. अशा या मार्गावर देवशेत ते पिराजिक ढासळलेली एक बाजू सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देवून सुस्थितीत केली तरच येथील वाहतुक सुरळीत आणि विना अपघात होण्यास मदत होणार आहे. एखादा अनर्थ होण्याची वाट न पाहता सार्वजनिक विभागाने या मार्गावरील वाहतुक सुरळीत होण्यासाठी रस्तयाची बाजू ढासळलेल्या ठिकाणी बांधी बांधून अपघात विरहीत रस्ता करावा अशाप्रकारची केळशी परिसरातून मागणी होत आहे.
आंबवली बुदु्रक फाटा ते केळशी दरम्यानच्या रस्त्यात पडलेले खड्डे वाहतुकीला अडचणी निर्माण करत आहेत. त्यात आता देवशेत ते पिरानजिकची एक बाजू ढासळल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाची डागडूजी करून रस्ता सुस्थितीत केला नाही तर शिवसैनिकांना जनहितासाठी रस्त्यावर उतारावे लागेल. रस्त्यावर उतरल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील.अशाप्रकारचा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे केळशी विभाग समन्वयक विजय साबळे यांनी दिला आहे.

























































