उत्तर प्रदेशात फोडाफोडी; भाजपनेही दोन आमदार फोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
yogi adityanath

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये आमदारांची फोडाफोडी सुरू झाली आहे. योगी सरकारमधील दोन मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने राजकीय वातारण चांगलेच तापले आहे. राज्यात भाजपला गळती लागली असतानाच भाजपनेही कॉँग्रेस आणि सपाच्या दोन विद्यमान आमदारांना गळाला लावत विरोधकांना धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे.

सहारनपूर जिह्यातील बेहाट येथील काँग्रेसचे आमदार नरेश सैनी, फिरोजाबादमधील सिरसागंज मतदारसंघातील समाजवादी पार्टीचे आमदार हरिओम यादव आणि सपाचे माजी आमदार धरमपाल यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांनी नवी दिल्ली येथील पक्ष कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला.

  • हरी ओम यादव हे सपाचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या जवळचे मानले जातात. ते सध्या सिरसागंजचे आमदार आहेत. पक्षविरोधी कारवायांसाठी गेल्या वर्षी त्यांची सपामधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली होती.
  • सहारनपूरचे माजी खासदार इम्रान मसूद सपामध्ये सामील झाल्याच्या घोषणेनंतर नरेश सैनी त्यांच्या मार्गावर जाऊ शकतात अशी चर्चा होती. मात्र त्यानंतर त्यांनी ही अफवा असल्याचे म्हटले होते आणि मी सपा किंवा भाजपमध्ये जाणार नसल्याचे सांगितले होते.

कॉँग्रेसपुढे आव्हान

उत्तर प्रदेशात काँग्रेसची ताकद कमी आहे. त्यामुळे काँग्रेस सोडून जाणाऱया नेत्यांना रोखण्याचे आव्हान पक्षनेतृत्वासमोर आहे. यातच आता विद्यमान आमदार पक्ष सोडून गेल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.