पंखांवर चित्र काढून तिने दिली स्वप्नांना भरारी, आफरिनच्या कलेची देशविदेशात वाहवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पक्ष्यांच्या पंखांवर रंग भरून अनोखे चित्र साकारणाऱया आफरिन खानच्या कलेची देशविदेशात वाहवा होत आहे. आफरिनने काढलेल्या पंखांवरील पेंटिंगना चांगली मागणी आहे. फेदर आर्टिस्ट म्हणून तिने स्वतःची ओळख बनवली आहे.

उत्तर प्रदेशातील रामपूर जिह्यातील 24 वर्षांची आफरिन खान हिला लहानपणापासून कलेची आवड होती. तिच्यातील कलागुण हेरून आई-वडिलांनी तिला पाठबळ दिले. तिचे वडील स्थानिक कलाकारांची कला बघण्यासाठी तिला घेऊन जात. आफरिनने फाईन आर्टचे शिक्षण घेतले. शिक्षणाला क्रिएटिव्हिटीची जोड देऊन पक्ष्यांच्या पंखावर पेंटिंग साकारायला सुरुवात केली. तिने फेदर आर्ट बाय आफरिन नावाच्या इन्स्टाग्राम पेज तयार केलेय. त्यावर ती चित्रे अपलोड करते. पाचशे रुपयांपासून चार ते पाच हजारांपर्यंत तिची पेंटिंग विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घर, ऑफिस, दुकाने सजवण्यासाठी फेदर आर्टचा वापर अधिक प्रमाणात होतो. फेदर आर्टशिवाय पॅनव्हास पेंटिंग, वॉटर पेंटिंग, लॅण्डस्केप पेंटिंग, अरेबिक पॅलिग्राफी अशा कलाकृतीतही तिचा हातखंडा आहे.

रस्त्यावर पडलेले पंख ती गोळा करते. कॉलेज पॅम्पसमधूनही ती पंख जमवते. त्यांना स्वच्छ करून त्यावर ती चित्रे काढते. लोकांना पंखावर स्वतःचे चित्र बघायला आवडते. त्यामुळे अशा फेदर आर्टला मागणी असल्याचे आफरिन सांगते.