
उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या गुलशन उर्फ मुन्ना हत्याकांड प्रकरणाचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, प्रेमसंबंध आणि त्यातून झालेल्या ब्लॅकमेलिंगमुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत मुन्ना यांची प्रेयसी सुमन देवी आणि तिच्या भावाला अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुन्ना यांचे दोन विवाह झाले होते, मात्र त्यांचे सुमन देवी नावाच्या एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध जुळले होते. सुमनचा पती कामाच्या निमित्ताने गावाबाहेर राहत असल्याने मुन्ना तिला नेहमी मदत करत असत, त्यातूनच त्यांचे सूत जुळले. मात्र, काही काळाने मुन्ना यांनी सुमनवर वारंवार भेटीसाठी दबाव टाकण्यास आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मुन्ना यांच्या सततच्या छळाला कंटाळून सुमनने ही बाब आपल्या भावाला सांगितली. त्यानंतर दोघांनी मिळून मुन्ना यांचा काटा काढण्याचा कट रचला. ठरलेल्या योजनेनुसार, सुमनने 18 मार्च रोजी मुन्ना यांना तिच्या माहेरी भेटीसाठी बोलावले. मुन्ना तिथे पोहोचताच सुमनचा भाऊ आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर लोखंडी सळ्यांनी भीषण हल्ला केला, ज्यामध्ये मुन्ना यांचा जागीच मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मुन्ना यांचा मृतदेह एका पोत्यात भरून जवळच्या कालव्यात फेकून दिला. मुन्ना घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांना मुन्ना यांची मोटारसायकल एका निर्जन स्थळी सापडली. त्यानंतर फोन रेकॉर्ड्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस सुमनपर्यंत पोहोचले.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता सुमनने हत्येची कबुली दिली. त्यानंतर रविवारी 22 मार्च रोजी पोलिसांनी कालव्यातून मुन्ना यांचा मृतदेह बाहेर काढला. मुन्ना हे आगामी ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. त्यांच्या पश्चात दोन पत्नी आणि 18 मुले असा मोठा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून पोलीस फरार साथीदारांचा शोध घेत आहेत.


























































