
उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील दांदरपुर गावात कथावाचक मुकुट मणि यादव आणि त्यांचे सहकारी संत सिंह यादव यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाने आता हिंसक वळण घेतले आहे. या प्रकरणी गुरुवारी‘अहिर रेजिमेंट’ आणि ‘यादव महासभा’च्या कार्यकर्त्यांनी दांदरपुर गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, जमावाने पोलिसांवर दगडफेक केली आणि लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवला. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, 21 जून 2025 रोजी इटावाच्या बकेवर परिसरातील दांदरपुर गावात श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. कथावाचक मुकुट मणि यादव आणि त्यांचे सहकारी संत सिंह यादव यांना गावातील काही लोकांनी त्यांच्या जातीच्या आधारावर लक्ष्य केले. त्यांच्यावर जात लपवून कथा सांगण्याचा आरोप करत मारहाण करण्यात आली. त्यांचे मुंडन करण्यात आले आणि एका महिलेच्या पायावर नाक घासण्यास भाग पाडले गेले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
यातच आज ‘अहिर रेजिमेंट’चे नेते गगन यादव यांनी दांदरपुर गावात जाण्याचे आवाहन केल्यानंतर सुमारे दोन हजार कार्यकर्ते गुरुवारी गावात पोहोचले. बकेवर पोलीस ठाण्याजवळ जमलेल्या या जमावाने दोषींवर कठोर कारवाईची मांगणी केली. पोलिसांनी त्यांना गावात प्रवेश करण्यापासून रोखले असता, जमावाने दगडफेक सुरू केली आणि पोलिसांच्या वाहनांचे नुकसान केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि हवेत गोळीबार करावा लागला. या घटनेत पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले असून, काही वाहनेही जप्त केली आहेत.

























































