
देशातल्या कारागृहांमध्ये असलेल्या कैद्यांच्या बाबतीत एक नवीन माहिती उघड झाली आहे. अनेक कारागृहांमधील कैदी हे सुशिक्षित असून त्यांच्याकडे अभियंता किंवा पदव्युत्तर पदवी असल्याची बाब समोर आली आहे.
देशातील एकूण 3 लाख 30 हजार 487 कैद्यांपैकी 1.2 टक्के कैदी इंजिनिअर असून 1.67 टक्के कैद्यांचं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झालं आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या 2019च्या अहवालात हे आकडे देण्यात आले आहेत. देशातील एकूण सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित कैद्यांमध्ये सर्वात वरचा क्रमांक उत्तर प्रदेशचा आहे. देशभरातील एकूण कारागृहांमध्ये असलेले तब्बल 3740 कैदी हे तंत्रशिक्षणाचे पदवीधर आहेत. त्यातील सर्वाधिक म्हणजे 727 कैदी हे उत्तर प्रदेशातील कारागृहांमध्ये बंदिस्त आहेत.
उत्तर प्रदेशच्या कारागृहाचे महासंचालक आनंद कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तंत्रशिक्षण घेतलेले बहुतांश कैदी हे बलात्कार आणि हुंडाबळी अशा गंभीर गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत आहेत. तसंच काही जण आर्थिक गुन्ह्यांसाठीही शिक्षा भोगत आहेत. देशातील पदव्युत्तर पदवीधारक कैद्यांमध्येही सर्वात वरचा क्रमांक उत्तर प्रदेशचाच असून एकूण 5282 कैद्यांपैकी 2010 कैदी एकट्या उत्तर प्रदेशमध्ये आहेत.
उत्तर प्रदेशात कैद्यांच्या या शिक्षणाचा वापर त्यांच्या कारागृहातील वास्तव्यादरम्यान करून घेतला जात आहे. ज्यांचं तंत्रशिक्षण विभागात शिक्षण झालं आहे. त्यांना कारागृहातील तांत्रिक सुधारणांवेळी सहभागी करून घेण्यात येत आहे. जेलमध्ये रेडिओ यंत्रणा बसवणं, माहितीचे संगणकीकरण करणं अशा विविध कामांमध्ये त्यांचा सहभाग असतो. तसंच, अनेक कैदी शिक्षक बनले असून इ-साक्षरता अभियानात सहभागी होत आहेत, असं कुमार यांचं म्हणणं आहे.


























































