अफवा पसरू नये म्हणून यूपीच्या 21 जिह्यांत 24 तास मोबाईल, इंटरनेट बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

गेल्या आठवडय़ात शुक्रवारी नमाजानंतर उसळलेल्या सीएएविरोधी हिंसाचारात 19 जणांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी रात्री 10 वाजेपर्यंत 24 तासांसाठी 21 जिह्यांतील इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद ठेवली होती. नमाजादरम्यान अफवा पसरू नयेत म्हणून राज्य प्रशासनाने ही खबरदारी घेतली होती.

राजधानी दिल्लीतील जामा मशीद भागात सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सलग दुसऱ्या शुक्रवारी जोरदार निदर्शने सुरू राहिली. गेल्या शुक्रवारी उत्तर प्रदेशातील हिंसाचारात 19जणांचा मृत्यू झाला होता. मात्र आता परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याचे राज्याचे डीजीपी ओ. पी. सिंह यांनी सांगितले. खबरदारी म्हणून लखनौ, मुरादाबाद, अमरोहा, संभल, गाझियाबाद, मेरठ, कानपूर, सीतापूर, शामली, बुलंदशहर, सहारनपूर, फिरोझाबाद तसेच मथुरासहित 21 जिह्यांत 24 तासांसाठी इंटरनेटवर प्रतिबंध लादण्यात आले होते. कानपूरमध्ये सीएए आणि एनआरसीच्या विरोधात गेल्या शुक्रवारी बाबुपुरवा आणि यतीमखाना या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार झाला. आज शुक्रवारी मुझफ्फरनगरमधील मीनाक्षी चौक या संवेदनशील भागात सुरक्षा दलाने पोलिसांच्या मदतीने फ्लॅगमार्च केला. मशिदींजवळही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

आंदोलनाचे लोण मेरठ, बिजनौरमध्येही पसरले

मेरठमध्येही या आंदोलनाचे लोण पसरले असून येथील संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा दलांसहीत न्यायदंडाधिकारीही हजर आहेत. लोकांनी एकत्र जमू नये असे आदेशच पोलिसांनी जनतेला दिले आहेत. येथे शांतता समित्यांमध्ये पदाधिकाऱ्यांनी परिसरातील लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. त्याचवेळी बिजनौरमध्ये संवेदनशील भागांमध्ये पोलिसांच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. येथे सहा ड्रोन कॅमेरे आणि 259 गुप्त कॅमेऱ्यांच्या मदतीने परिसरावर लक्ष ठेवण्यात येत आहे. इटावा येथेही शांतता प्रस्थापित करण्यासाठी एसएपी संतोषकुमार मिश्रा यांनी गुरुवारी मुस्लिम समाजासोबत क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते.

जामा मशिदीसमोर सीएएविरोधी आंदोलन

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात राजधानी दिल्लीतील जामा मशिदीसमोर शुक्रवारच्या नमाजानंतर आंदोलक एकत्र जमले. यामुळे पोलीसही सतर्क झाले असून त्यांनी पोलिसांच्या तुकडय़ा सज्ज ठेवल्या आहेत. सतर्कतेचा उपाय म्हणून येथील मेट्रो रेल्वे स्थानकात एण्ट्री आणि एक्झिट गेट बंद करण्यात आले आहेत. गेल्या शुक्रवारीही जामा मशिदीजवळ आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली होती. त्यानंतर 15जणांना अटक करण्यात आली होती. आजही शुक्रवारी दिल्लीतील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी फ्लॅगमार्च केला. येथील सीलमपूर, वेलकम, जामा मशीद आणि मुस्तफाबाद भागांवर पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने दिल्लीवर नजर ठेवली आहे.