वारं फिरलंय… उत्तर प्रदेशमध्ये सपाचा दणदणीत विजय; भाजप पिछाडीवर, अपक्षांचीही सरशी

उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. या निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पार्टी स्वानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आमनेसामने येणार आहेत. या निवडणुकीमध्ये ताकद दाखवून विधानसभेला सामोरे जाण्याची तयारी दोन्ही पक्षांनी केली आहे. तत्पूर्वी सीतापूर जिल्ह्यातील महमुदाबाद नगरपालिका अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीमध्ये समाजवादी पार्दीचा दणदणीत विजय मिळवत भाजपला धक्का दिला आहे. या निवडणुकीमध्ये भाजप पाचव्या क्रमांकावर फेकला गेला. धक्कादायक म्हणजे अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनाही भाजप उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाले. यामुळे उत्तर प्रदेशमधील वारे फिरलेय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सीतापूर जिल्ह्यातील महमुदाबाद नगरपालिका अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने मंत्री, वरिष्ठ नेत्यांनाही मैदानात उतरवले होते. मात्र याचा काहीच फायदा भाजपला झाला नाही. भाजप उमेदवाराला फक्त 1,352 मते पडली आणि तो पाचव्या क्रमांकावर फेकला गेला. तर दुसरीकडे सपाच्या विजयी उमेदवाराला 8,906 मते मिळाली. या निवडणुकीत उतरलेल्या काँग्रेस, अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनाही भाजप उमेदवारापेक्षा जास्त मते मिळाली.

भविष्यातील राजकारणाचे संकेत

दरम्यान, या विजयानंतर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विजयी उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत भाजपवर निशाणा साधला. महमुदाबादमध्ये समाजवादी पक्षाचा विजय मनोबल वाढवणारा आहे. भाजप पाचव्या क्रमांकावर घसरणे हे उत्तर प्रदेशमधील भविष्यातील राजकारणाचे संकेत आहेत, अशी पोस्ट अखिलेश यादव यांनी केली.

भाजपमधील अंतर्गत वाद उफाळला

महमुदाबाद नगरपालिका पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा अंतर्गत वाद उफाळून आला. अध्यक्षांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपमधील अनेक नेत्यांनी दावा ठोकला. भाजपने या निवडणुकीत माजी खासदार राजेश वर्मा यांचे जवळचे संजय वर्मा यांना तिकीट दिले. मात्र यामुळे नाराज झालेल्या अतुल वर्मा आणि अमरीश गुप्ता यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. याचा परिणाम निकालावरही झाला.