उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह यांचा राजीनामा, वादग्रस्त वक्तव्यांमुळे गाजली कारकीर्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. घटनात्मक अडचणीमुळे त्यांना पद सोडावे लागले आहे असे सांगण्यात येत आहे. अवघ्या तीन महिन्यांसाठी मुख्यमंत्री असलेले रावत आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिले.

तीरथसिंह रावत यांना गेल्या बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नवी दिल्ली येथे बोलवले होते. त्याच वेळी रावत यांना राजीनामा देऊ लागू शकतो, अशी माहिती त्यांना दिली गेल्याचे सांगितले जाते. रावत यांनी शुक्रवारी राज्यपाल बेबीरानी मौर्य यांच्याकडे भेटीची वेळ मागितली होती. या भेटीमध्ये ते आपला राजीनामा देतील अशी चर्चा होती. अखेर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यापालांकडे सुपुर्द केला आहे.

शुक्रवारी रावत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. आपल्या कारकीर्दीत केलेल्या कामगिरींची त्यांनी यादी वाचून दाखवली, परंतु राजीनाम्याचा उल्लेख केला नाही.

वादग्रस्त व्यक्तव्यं

मुलांवर होणाऱ्या संस्काराला आईवडीलच जबाबदार असतात. मग प्रवासात मुलाला घेऊन फिरणारी महिला जर फाटकी जीन्स घालून प्रवास करीत असेल तर ती मुलांवर कसले संस्कार करणार? असे वादग्रस्त वक्तव्य मुख्यमंत्री तीरथ सिंह यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून चौफेर टीका झाली होती. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ महिलांनी ट्विटरवर #RippedJeans हा ट्रेंड चालवला होता.

तीरथसिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भरपूर स्तुती करताना त्यांची तुलना थेट भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्रीराम यांच्याशी केली होती. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रतिमा उंचावली आहे, आज अनेक मोठ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष मोदी यांना भेटण्यासाठी रांगेत उभे असतात असे वक्तव्य रावत यांनी केले होते. त्रेता आणि द्वापर युगामध्ये जसा भगवान राम आणि भगवान कृष्ण यांनी अवतार घेतला होता, त्याच प्रकारे येणाऱ्या कालावधीमध्ये पंतप्रधान मोदी यांना लोकं लक्षात ठेवतील असे रावत यांनी आपल्या भाषणात म्हटले होते.

घटनात्मक अडचण

त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर 10 मार्च रोजी पौडी गढवाल येथील भाजपा खासदार तीरथसिंह रावत यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. रावत हे राज्याच्या विधिमंडळाच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नाहीत. त्यामुळे घटनेनुसार रावत यांना सहा महिन्यांच्या आत म्हणजेच 10 सप्टेंबरपूर्वी विधानसभा पोटनिवडणूक जिंकावी लागेल. तरच त्यांना मुख्यमंत्रीपदावर राहता येणार आहे. तीरथसिंह रावत हे गंगोत्री मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असेही म्हटले जात आहे. कोरोना परिस्थितीमुळे उत्तराखंड पोटनिवडणुकांबाबत निवडणूक आयोगाने अजूनही निर्णय घेतलेला नाही. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच बहुतेक निवडणुका जाहीर होतील.