लेख : हस्ताक्षराकडे दुर्लक्ष धोकादायक

>>वि. प्र. मेंडजोगी<<

nanahandwriting@yahoo.com

सध्याच्या संगणक युगात जास्त लिहावे लागणार नाही, तेव्हा अक्षर सुंदर असण्याची फारशी गरज नाही असे सांगितले जाते. मात्र असा विचार करून पालक आपल्या मुलाच्या भविष्याशी धोकादायक खेळ खेळत आहेत हे सांगावेसे वाटते. शिक्षण क्षेत्रात नजीकच्या काळात तरी हाताने लिहिण्याशिवाय पर्याय नाही. सुंदर हस्ताक्षराकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही. उलट प्रत्येकाने आपले हस्ताक्षर सुंदर कसे होईल याचा प्रयत्न करायला हवा.

बहुसंख्य विद्यार्थ्यांची अक्षरे खराब आहेत. ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करायला हवे. ५०-५५ वर्षांपूर्वी एवढी परिस्थिती नव्हती. त्याची दोन कारणे स्पष्ट आहेत की, तेव्हा वेळ पुरत नाही ही समस्या नव्हती. शिवाय शिक्षकही स्वतःचे अक्षर टाक, बोरू अशा साधनांनी सुंदर करण्याचा प्रयत्न करीत. सध्या शाळेच्या वेळेत सुंदर अक्षर काढावयास शिकविणे कठीण आहे. शिवाय टाक, बोरू ही साधनेही अदृश्य झाली आहेत.

असाही एक मतप्रवाह जोरात आहे की, सध्याच्या संगणक युगात जास्त लिहावे लागणार नाही, तेव्हा अक्षर सुंदर असण्याची फारशी गरज नाही. मात्र असा विचार करून पालक आपल्या मुलाच्या भविष्याशी धोकादायक खेळ खेळत आहेत हे सांगावेसे वाटते. शिक्षण क्षेत्रात नजीकच्या काळात तरी हाताने लिहिण्याशिवाय पर्याय नाही. सध्याच्या स्पर्धायुगात एकेका गुणाने मुलाचे भविष्य बिघडते हे लक्षात घ्यावे. खराब अक्षरामुळे ४-५ टक्के गुण निश्चित कमी होतात. तेच सुंदर अक्षरामुळे निदान २-३ टक्के गुण जास्त मिळतात.

सुंदर अक्षरात केलेला अभ्यास चांगल्या प्रकारे स्मरणात राहतो. त्यामुळेही चांगले गुण मिळतात. सुंदर अक्षरामुळे आत्मविश्वास वाढतो. वागण्या-बोलण्यात शिस्त येते. एकंदरीतच तुमचे आयुष्य बदलते, आनंदी होते.

सुंदर अक्षराची व्यक्ती आपल्या अक्षरामुळे सर्वांना आनंद देत असते. सुंदर अक्षराचा विद्यार्थी शिक्षकांचा लाडका असतो. कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी लग्नकार्य, इतर समारंभ फलकलेखन अशावेळी चांगले अक्षर असणाऱ्याची लोकांना हमखास आठवण होते.

योग्य मार्गदर्शनाने कोणीही फक्त २५ तासांत आपले अक्षर आमूलाग्र सुधारू शकतो. याला आवश्यक ते योग्य साहित्य वापरावे लागते. चांगल्या प्रतीची वही, कटनिबसह पेन एवढय़ाच गोष्टी लागतात. ‘हस्ताक्षर सुधारा फक्त २५ तासांत’ हे माझे पुस्तक यासाठी अतिशय उपयुक्त ठरले आहे.

अक्षर कोणत्याही वयात सुधारते. डावखुऱ्यांचेही सुधारते. सध्या हस्ताक्षराचे शास्त्र्ााsक्त शिक्षण घेतलेले प्रशिक्षक असतात. शक्यतो त्यांच्याकडे शिकल्यास आपल्याला कमी वेळेत, कमी खर्चात, कमी कष्टात हे काम करता येईल.

सध्या सर्वांनाच इंग्लिश शिकावयाचे असते. इंग्लिशमध्ये प्लेन व कर्सिव्ह अशा दोन लिपी असतात. बऱ्याच ठिकाणी तोंडी सांगतात की, बोर्डाला कर्सिव्ह चालत नाही. वास्तविक सर्वांना कर्सिव्ह चालते. दुसरे असे सांगतात की, तुमचे दहावीचे पेपर खेडेगावात तपासायला जातील. त्यांना कर्सिव्ह समजत नाही. म्हणून कर्सिव्ह लिहू नका. कर्सिव्ह चांगले असेल तर ते कोणालाही वाचता येते. घाणेरडे असेल तर कोणालाही वाचता येत नाही. म्हणून खेडय़ातला व शहरी असा फरक न करता चांगले कर्सिव्ह असेल तर लिहा. घाणेरडे असेल तर प्लेन इंग्लिशमध्ये लिहा असे सांगावे.

सुंदर कर्सिव्ह व प्लेन इंग्लिश लिहिणाऱ्यामध्ये मार्काच्या दृष्टीने काय फरक पडतो ते पाहू.

> पहिल्याचा पेपर पूर्ण होतो, दुसऱ्याचा पेपर थोडा राहण्याची शक्यता असते. कारण कर्सिव्ह वेगाने लिहिता येते.

> कर्सिव्ह लिहिणाऱ्याला, लिहिलेले तपासण्याला, दुरुस्तीला वेळ मिळतो. दुसऱ्याला तसा वेळ मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे काही गुण कमी होऊ शकतात.

> आणखी नवीन मुद्दे सुचायला वेळ मिळतो. त्यामुळे काही गुण वाढू शकतात. दुसऱ्याच्या बाबतीत ही शक्यता कमी असते.

> चांगले कर्सिव्ह हे चांगल्या प्लेनपेक्षा नेहमीच जास्त गुण मिळवून देतो.

शिवाय भविष्यात तुम्ही डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इंजिनीअर झाल्यावर आयुष्यभर प्लेन लिहिणे अपेक्षित नाही. तेव्हा कर्सिव्ह लवकरात लवकर शिकणे हितावह आहे.

७०-८० वर्षांपूर्वी जेव्हा संगणक, टंकलेखन यांचे प्रस्थ नव्हते, तेव्हा बऱ्याच ठिकाणी लेखनिकाच्या जागा असत. सुंदर हस्ताक्षर असणाऱ्यांना तो एक हमखास नोकरीचा मार्ग होता. शिवाजी महाराज, पेशवे, मुसलमान बादशहा या सर्वांच्या पदरी सुंदर अक्षर असणारी माणसे असत.

खराब अक्षराच्या मुलांचे निदान करताना पालक सांगतात तो डावखुरा आहे, तो पोक काढून बसतो, तो पेन चुकीचा धरतो, तो लिहिताना एकाग्र नसतो, त्याच्या डोक्यात इतर विचार असतात.

याचा व्यत्यास म्हणजे जे उजव्या हाताने लिहितात, ताठ बसतात, पेन व्यवस्थित धरतात, एकचित्ताने लिहितात त्या सर्वांचे अक्षर सुंदर असावयास हवे. पण वस्तुस्थिती तशी नाही. सुंदर अक्षर हे मेंदूत जन्म घेते. मग तुम्ही डावखुरे आहात, पोक काढून बसलात, पेन नीट धरला नाहीत किंवा तुम्ही एकाग्र नाहीत- या गोष्टी अतिशय गौण आहेत. तुम्हाला योग्य अक्षर कसे काढावयाचे याचे शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे.

मध्यंतरी मुंबईतील एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापिकेने दूरदर्शनवरील मुलाखतीत सांगितले की अक्षर जास्त सुंदर असण्याची गरज नाही. वाचता आले तरी बस झाले. जेव्हा शिक्षणक्षेत्रातील अधिकारी व्यक्ती असे सांगते तेव्हा आश्चर्य वाटते. हस्ताक्षराबाबत आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी स्थिती आहे.

चांगले अक्षर असणाऱ्या शिक्षकांना विशेष वेतनवाढ द्यावी. म्हणजे शिक्षक आपले अक्षर चांगले करतील. अक्षराच्या स्पर्धा घ्याव्यात. शासनाने किंवा शिक्षण संस्थांनी अक्षराच्या परीक्षा घ्याव्यात. २३ जानेवारी हस्ताक्षर दिन म्हणून साजरा करावा.

कोणाचेही अक्षर केवळ २५ तासांत सुधारते हे मी गेल्या २० वर्षांत ५००० पेक्षा जास्त लोकांना शिकवून सिद्ध केले आहे. त्यासाठी वयाची अट नाही. शिवाय हस्ताक्षर शिक्षकही मी तयार केले आहेत. मुंबई, नागपूर, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, सातारा, बेळगाव, जळगाव, बीड, नंदुरबार, पिंपरी-चिंचवड, नगर या ठिकाणी त्यांचे व्यावसायिक वर्ग यशस्वीरीत्या चालवीत आहेत.

सुंदर हस्ताक्षराकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही. उलट प्रत्येकाने आपले हस्ताक्षर सुंदर कसे होईल याचा प्रयत्न करायला हवा. हस्ताक्षर चांगले नसले तरी सध्याच्या संगणकाच्या युगात काही बिघडत नाही हा समज चुकीचा आहे. आजही चांगले हस्ताक्षर ही एक गरजच आहे.