न्यायालयाच्या आदेशानंतर लसीकरण मोहीम सुरू; शहापूरमधील भटक्या कुत्र्यांचा ‘बंदोबस्त’

देशभरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येमुळे सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर शहापूर नगरपंचायतीला जाग आली आहे. नगरपंचायतीने तातडीने रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू केली आहे. नगरपंचायत हद्दीत दोनशेहून अधिक भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून नागरिक, महिला भगिनींमध्ये कुत्र्यांची दहशत पसरली होती.

भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने २२ ऑगस्ट रोजी तीन न्यायमूर्तीच्या पीठाने भटक्या कुत्र्यांवर नियमांनुसार उपचार, नसबंदी आणि लसीकरणानंतर कुत्र्यांना त्याच परिसरात सोडावे असे स्पष्ट केले होते. त्यातच याबाबत संबंधित सचिवांना समन्स बजावल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना जाग आली असून त्यांनी भटक्या कुत्र्यांवर लसीकरण मोहीम सुरू केली असल्याचे समजते. त्यानुसार शहापूर नगरपंचायतीनेदेखील रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू केली आहे.

परिसरात होती दहशत
शहापूर शहरातील भटक्या कुत्र्यांसह काही पिसाळलेल्या कुत्र्यांची नागरिकांमध्ये भीती पसरली होती. भटके कुत्रे बाईकच्या मागे धावल्यामुळे अनेक बाईकस्वारांचे अपघातदेखील झाल्याने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी करण्यात येत होती. शहापूर नगरपंचायत हद्दीत सुमारे दोनशेहून अधिक भटक्या कुत्र्यांची संख्या असून आतापर्यंत सुमारे शंभरच्या आसपास श्वानांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज गायकवाड यांनी दिली. परिसरातील भटक्या तसेच घरगुती श्वानांना रेबीज लस देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपंचायतीकडून करण्यात आले आहे.