‘मिशन कवचकुंडल’साठी साताऱ्य़ात दोन लाख लसी, आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन लसीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त नागरिकांचा प्रतिसाद मिळण्यासाठी ‘मिशन कवचकुंडल’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी सातारा जिल्ह्यात सुमारे दोन लाख लसींचा साठा उपलब्ध आहे. याचबरोबर, लसीकरण केंद्रांचीही संख्या वाढविण्यात आली असून, आरोग्य विभाग घरोघरी जाऊन लसीकरण करत आहे.

सातारा जिल्ह्यात लसींचे डोस अधिक असताना नागरिकांचा प्रतिसाद थंडावला होता. यासाठी शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने कवचकुंडल मोहीम राबविली आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी लसीकरण सत्रांचीही संख्या वाढवून खासगी 494 व शासकीय 58 केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. दुर्गम भागातील ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित आहेत. या नागरिकांचे लसीकरणासाठी आरोग्य विभागाने सर्व्हे सुरू केला असून, मोबाईल व्हॅनद्वारे आरोग्य विभाग गावात पोहोचून घरोघरी लसीकरण केले जात आहे.

या मोहिमेसाठी लसींची संख्या वाढविण्यात आली आहे. यामध्ये सुमारे एक लाख 40 हजार लस शिल्लक असून, 50 हजार लस उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी पात्र लोकसंख्या 21 लाख आहे. यामधील पहिला डोस सुमारे 18 लाख 65 हजार व दुसरा डोस सुमारे 7 लाख 70 हजार जणांनी घेतला आहे. त्यामुळे लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण होण्यासाठी अद्यापही अडीच लाख लसीकरण होणे बाकी आहे. महिलांचे शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात 90 टक्क्यांहून अधिक लसीकरण पूर्ण करणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी ‘मिशन कवचकुंडल अभियान’ राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी लसींचाही साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला असून, नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होऊन लसीकरण करावे. – डॉ. प्रमोद शिर्के, नोडल अधिकारी, लसीकरण विभाग.