
बालकांचे आयुष्य निरामय आणि सुदृढ राहावे, त्यांचे जीवनमान रोगराईपासून सुरक्षित राहावे, यासाठी शासन कटिबद्ध राहून विविध योजना राबविते. विविध प्रतिबंधात्मक डोस बालकांना मिळावेत, यासाठी प्रयत्न करते. त्यासाठी प्रत्येक आठवडय़ातील एक दिवस डोस देण्यात येतात. मात्र, आजरा शहरातील बालकांच्या मातांना त्यासाठी 4-5 किलोमीटर पायपीट करीत पारेवाडी आरोग्य उपकेंद्र गाठावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. आजरा शहरात अशी एकही जागा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. याबाबत संबंधित बालकांच्या पालक-माता संताप व्यक्त करीत आहेत.
राज्य आणि केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून बालकांना विविध रोगांवरील प्रतिबंधात्मक डोस दिले जातात. यामध्ये पोलिओबरोबरच बी.सी.जी. डोस, पेन्टाप्लस डोस, बूस्टर डोस आदी विविध प्रकारचे डोस दिले जातात. यासाठी येथे प्रत्येक आठवडय़ातील मंगळवार राखीव असतो. यासाठी प्रत्येक गावात आरोग्य विभागाच्या इमारती किंवा संबंधित ग्रामपंचायतींकडून उपलब्ध होणाऱया जागेमध्ये हे डोस दिले जातात. आजरा शहरात पूर्वी हे डोस कुमारभवन शाळेत देण्यात येत होते. मात्र, महिनाभरापासून हे डोस आजऱयापासून पाच कि.मी. अंतरावरील पारेवाडी आरोग्य उपकेंद्रात देण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आहे. अर्थातच त्यासाठी आजरा शहरातील संबंधित बालकांच्या मातांना बालकाला घेऊन पारेवाडी आरोग्य उपकेंद्रात जावे लागत आहे.
आजरा शहर तालुक्याचे ठिकाण आहे. येथे शासकीय विभागांच्या अनेक इमारती आहेत, तर त्यातील अनेक इमारती वापराशिवाय पडून आहेत. बालकांसाठी डोस देण्याची प्रक्रिया कुमारभवनमधून थांबल्यावर येथेच दुसरी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासक आणि राजकीय नेत्यांची होती. मात्र, पारेवाडी येथे डोससाठी जाण्याची वेळ मातांवर आली आहे. याबाबत संबंधित पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या उन्हाचा कडाका मोठा असताना चिमुकल्यांना घेऊन पालक, माता पारेवाडी गाठत आहेत. काहीजण उन्हात दुचाकीवरून, तर काही मातांना पायी जावे लागत आहे.
याबाबत विचारणा केली असता आजरा येथील ग्रामीण रुग्णालयात लवकरच डोस देण्याची व्यवस्था होत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनवणे यांनी सांगितले. येथे सोय झाल्यास बालक व पालक-मातांची फरपट थांबणार आहे.




























































