
हिंदुस्थानात झायडस कॅडिला कंपनीची झायको-डी ही 12 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीची लस ऑक्टोबर महिन्यात बाजारात येणार आहे. जगातील ही पहिली डीएनए कोरोना लस असल्याने ती अधिक गुंतागुंतीची असून ही लस बनवणे वेळखाऊपणाचे काम आहे. त्यामुळे या लसीची किंमत बाजारात असलेल्या इतर कोरोना लसींच्या तुलनेत थोडी जास्त असणार आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी देशात आता अनेक लसी उपलब्ध झाल्या असल्या तरी लहान मुलांसाठी एकही लस उपलब्ध झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर देशाच्या औषध नियंत्रण प्राधीकरणाने 20 ऑगस्टला झायडस कॅडिला कंपनीला तीन डोस असलेल्या लसीचे उत्पादन करायला परवानगी दिली. ही लस 12 वर्षांवरील मुलांपासून ते 18 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी उपयोगी आहेच, पण त्या पुढील सर्व वयोगटातील व्यक्तींनाही उपयोगी आहे. झायको-डी नावाने बनण्यात आलेली ही लस देशाचा जैवतंत्रज्ञान विभाग आणि आयसीएमआरच्या मदतीने विकसित करण्यात आली आहे. लसीची चाचणी घेतल्यानंतर ही लस 66.6 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या लसीची चाचणी एकूण 28 हजार स्वयंसेवकांवर करण्यात आली. यात 12 ते 18 वयोगटातील सुमारे एक हजार मुलांचा समावेश होता.
डीएनए वॅक्सिन म्हणजे काय
डीएनए वॅक्सिनमध्ये (डीएनए लस) डीएनएमधील अत्यंत सूक्ष्म अशा घटकाचा समावेश असतो. हा घटक शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीला सगळी माहिती पुरवतो. लसीच्या माध्यमातून रोगजंतूशी मुकाबला कशा प्रकारे करावा याचे प्रशिक्षण या लसीद्वारे शरीराला दिले जाते.
- तीन डोस असलेली ही लस 18 दिवसांच्या अंतराने घेता येणार आहे. त्यामुळे एका व्यक्तीचे लसीकरण दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे.
- कोव्हिशिल्ड लस 780 रुपये, कोवॅक्सिन 1,410 रुपये तर स्पुटनिक लस ही 1,145 रुपयांना मिळते. त्या तुलनेत झायको-डीची किंमत थोडी जास्त असणार आहे. मात्र लसीच्या डोसची किंमत नेमकी किती असेल याबाबत कंपनीने गुप्तता बाळगली आहे.




























































