‘केमोथेरपी’ला आता बाय बाय; दोन वर्षांत येणार कर्करोगावर लस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कर्करुग्णांची (कॅन्सर) वाढ होत आहे. कर्करोग म्हटलं की पोटात भीतीचा गोळा येतो. कर्करुग्णांना केमोथेरपी, रेडियोथेरपीसारख्या वेदनादायी उपचार पद्धतीला सामोरे जावे लागते. मात्र आता या वेदनेतून कर्करुग्णांची सुटका होणार आहे. कारण येत्या दोन वर्षांमध्ये कर्करोगावर लस येणार असल्याचा दावा जर्मनीच्या संशोधकांनी केला आहे. अवघे जग वेदनामुक्त होणार आहे!

 बायोएनटेक कंपनीचे सीईओ डॉ. उगर साहिन आणि त्यांची पत्नी डॉ. ओझलेम टय़ुरेशी यांनी कोरोनावर फायजर लस तयार केली आहे. ही लस सध्या अनेक देशांमध्ये वापरली जात आहे. याच दांपत्याने आता कर्करोगावरील लस शोधल्याचा दावा केला आहे. त्यांनी टय़ूमरविरोधात शरीराची रोगप्रतिकारक क्षमता सक्षम करण्यावर यशस्वी संशोधन केले  आहे. जर सगळं व्यवस्थित पार पडलं, तर येत्या दोन वर्षांत कर्करोगावरदेखील लस उपलब्ध देऊ, असे या दोघांचे म्हणणे आहे.

 दुसरीकडे कोरोनावर लस तयार करणारे ऑक्सफोर्डचे संशोधक प्रा. सारा गिल्बर्ट आणि प्रा. एड्रियान हिल हेदेखील एम-आरएनए तंत्रावर आधारित कर्करोगावरील लस तयार करत आहेत. फुप्फुसाचा कर्करोग झालेल्या रुग्णांवर या लसीची चाचणी करण्याची तयारी त्यांनी पूर्ण केली आहे. लसीचे सुरुवातीला सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.

‘एम- आरएनए’वर आधारित संशोधन

जर्मनीचे शास्त्रज्ञ डॉ. उगर साहिन आणि  डॉ. ओझलेम टय़ूरेशी गेल्या 20 वर्षांपासून कर्करोग उपचार पद्धतींवर संशोधन करत आहेत. त्यांनी कोरोनावर  विकसित केलेली लस ‘एम- आरएनए’वर आधारित आहे. ‘एम- आरएनए’ मुळे पेशींमध्ये प्रथिने निर्माण केली जातात. त्याद्कारे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमतेला सुरक्षित अँटीबॉडी तयार करायला प्रेरित केले जाते. याच तंत्रावर कर्करोगावर लस तयार केली जात आहे.

लवकरच क्लिनिकल ट्रायल

कोरोनावर लस तयार करताना आम्ही ‘एम-आरएनए’वर आधारित कर्करोगावरील काही लसी तयार केल्या आहेत. लवकरच त्यांची क्लिनिकल ट्रायल होणार आहे, असे ओझलेम टय़ुरेशी यांनी सांगितले. आतापर्यंतच्या आमच्या संशोधनानुसार एम-आरएनए आधारित लसीमुळे कर्करोगाची लागण होण्यापूर्वीच शरीरात त्याविरुद्ध लढण्याची ताकद येते. त्यामुळे आता केमोथेरपी, रेडियोथेरपीच्या वेदनेतून रुग्णांची सुटका होईल. केस गळणे, भूक मंदावणे, वजन घटणे यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळेल, असे ओझलेम टय़ुरेशी म्हणाल्या.

महत्त्वाचे म्हणजे कोरोनावर लस तयार करत असताना संशोधकांना कर्करोगावरील लसीचा शोध लागला आहे. कोरोनाविरोधात अवघे जग झुंजत असताना संशोधकांनी ही मोठी आनंदवार्ता दिली आहे.