‘लक्षवेधी’ मताधिक्याने आमदार वैभव नाईक विजयी होणार! मालवणात शिवसैनिकांचा निर्धार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आमदार वैभव नाईक यांना उमेदवारी दिल्याबद्दल मालवण शिवसेनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. आम्ही सर्व शिवसैनिक २१ ऑक्टोबरला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सज्ज असून सर्वांधिक मताधिक्याने आमदार वैभव नाईक विजयी होतील. महाराष्ट्रात लक्षवेधी मताधिक्य आमदार नाईक यांना असेल. असा विश्वास जेष्ठ शिवसैनिक तथा माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी व्यक्त केला.

मालवण शहर शिवसेना कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत गोवेकर यांच्यासह उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, शहर प्रचारप्रमुख महेंद्र म्हाडगूत, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, तपस्वी मयेकर, सन्मेष परब, यशवंत गावकर, किसन मांजरेकर, दत्तात्रय नेरकर, अमोल वस्त यासह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षात मोठा विकासनिधी व जनतेला अपेक्षित असणारी कामे करण्यात आमदार नाईक यशस्वी झाले. येत्या काळात जनतेला अपेक्षित असणारा विकास साध्य केला जाईल. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढतच आहेत. यापुढेही हे पक्षप्रवेश चालूच राहतील. मालवणातून मोठे मताधिक्य देण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक सज्ज झाला आहे, असे हरी खोबरेकर, बबन शिंदे यांनी सांगितले.

मालवण शहरात लोकसभा निवडणुकीत मताधिक्याची घट झाली होती, ती घट यावेळी दूर करणारच. शहरात आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून ४० ते ५० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. येणाऱ्या काळातही असाच भरघोस निधी मिळेल. शहरातून मोठे मताधिक्य आमदार वैभव नाईक यांना दिले जाईल, असा विश्वास नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बाबी जोगी, महेंद्र म्हाडगूत यांनी व्यक्त केला.

भाजपची नाराजी दूर होईल

आमदार वैभव नाईक यांच्या उमेदवारी बाबत काही भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, आजची नाराजी उद्या राहणार नाही. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर केली जाईल असे नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या