
सामना ऑनलाईन । नालासोपारा
एटीएसने विविध आरोपांची खैरात करून हिंदुत्ववादी कार्यकर्ता असलेल्या वैभव राऊतच्या घरातून आठ गावठी बॉम्बसह स्पह्टकांचा साठा जप्त केल्याचा दावा करण्यात आला. पण स्वतः वैभवने तो सपशेल फेटाळून लावला आहे. मी कोणताही गुन्हा केला नसून मला विनाकारण या प्रकरणात गोवण्यात आले आहे. मी निर्दोष आहे. देवावर पूर्ण विश्वास असून कोणत्याही परिस्थितीत मी सुटणारच, असा जबरदस्त आत्मविश्वास वैभव राऊत याने व्यक्त केला आहे. आज एटीएस व स्थानिक पोलिसांनी त्याला बुरखा घालून त्याच्या घरी मोठय़ा बंदोबस्तात चौकशीला आणले. मात्र काहीही हाती लागले नसले तरी पोलिसांनी त्याची इनोव्हा गाडी जप्त केली आहे.
गोवंश संरक्षक कार्यकर्ता असलेल्या वैभव राऊतने बीफमाफियांना सातत्याने विरोध केला. त्यामुळेच एटीएसने शनिवार 11 ऑगस्ट रोजी नालासोपाऱयातील त्याच्या घरावर कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक धाड टाकली. सध्या तो एटीएसच्या ताब्यात आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास वैभवला एसआरपी व स्थानिक पोलिसांच्या पथकाने बुरखा घालून घरी आणले. ही बातमी भंडारआळीत वाऱयासारखी पसरताच हजारोंच्या संख्येने पुन्हा जमाव घराबाहेर जमला. पोलिसांनी वैभवला पहिल्या मजल्यावरील त्याच्या खोलीत नेले आणि 50 मिनिटे चौकशी केली. यावेळी कोणालाही आत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला होता.
शुक्रवारच्या मोर्चाला भंडारी समाजाचा पाठिंबा
वैभव राऊतवर आकसाने केलेल्या कारवाईविरोधात वसईत सह्यांची मोहीम हाती घेण्यात आली असून विविध संघटनांच्या वतीने शुक्रवार 17 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6.00 वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला अखिल भारतीय भंडारी समाजाने पाठिंबा दिला असल्याचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी म्हटले आहे.
आम्हाला त्याच्याशी बोलायचे आहे
चौकशी झाल्यानंतर 3 वाजून 50 मिनिटांनी वैभवला बुरखा घालून पोलिसांनी घराबाहेर आणले. यावेळी संतप्त नागरिकांनी वैभवचा बुरखा काढा.. आम्हाला त्याच्याशी बोलायचे आहे, अशी मागणी केली. बुरख्याआड असलेला खरोखर वैभवच आहे काय, अशीही शंका अनेकांनी व्यक्त केली. मात्र पोलिसांनी दुर्लक्ष करीत घराजवळील चिंचोळय़ा गल्लीतून त्याला नेले आणि गाडीत बसवले. त्यानंतर थोडय़ाच वेळाने वैभवला घेऊन एटीएसचे पथक मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान पोलिसांनी त्याच्या घराजवळ असलेली इनोव्हा गाडी जप्त केली आहे. चौकशीत नेमके काय झाले, गाडी का जप्त केली, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वैभवला घरी नेले तेव्हा त्याच्या नातेवाईकांना केवळ दोन मिनिटे बोलण्याची परवानगी दिली. त्यावेळी त्याने या संकटातून मला देव नक्की बाहेर काढेल.. एटीएसच्या चौकशीला तुम्ही सहकार्य करा असे सांगितले.
























































