
बिहारच्या समस्तीपूरचा ‘वंडर किड’ म्हणून ओळखला जाणारा युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याने यावर्षी 10 वीची बोर्ड परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला आहे. वैभव सध्या सीबीएसई (CBSE) बोर्डाचा विद्यार्थी असून त्याने यावर्षी अभ्यासाऐवजी पूर्णपणे आपल्या क्रिकेट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. पुढच्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या (IPL) सामन्यांसाठी सज्ज होण्यासाठी त्याने हा धाडसी पाऊल उचलले आहे.
वैभव सूर्यवंशी हा ताजपूर येथील मॉडस्टी स्कूलचा विद्यार्थी आहे. 17 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या 10 वीच्या परीक्षेसाठी त्याचे हॉल तिकीटही जारी करण्यात आले होते आणि शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्याचे परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले होते. शाळेने सर्व औपचारिकता पूर्ण केल्या होत्या, परंतु वैभवच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे परीक्षा केंद्रावर सुरक्षा व्यवस्था राखणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान होते.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बिहार क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी वैभव यावर्षी परीक्षेत बसणार नसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सातत्याने सुरू असलेले क्रिकेटचे सामने आणि व्यस्त वेळापत्रकामुळे त्याला परीक्षेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळू शकला नाही. सध्या वैभवचे प्राधान्य हे स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये आपली जागा मजबूत करणे आणि मॅच विनिंग कामगिरी सुरू ठेवण्यावर आहे, असे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.
गेल्या वर्षी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना सर्वात तरुण वयात पदार्पण आणि वेगवान शतक झळकावून वैभवने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. अलीकडेच अंडर-19 विश्वचषकात भारताला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली. भारतीय क्रिकेटचा ‘पुढचा सुपरस्टार’ मानल्या जाणाऱ्या वैभवला लवकरच भारतीय संघात स्थान मिळावे, अशी मागणीही आता क्रिकेट तज्ज्ञांकडून केली जात आहे.





























































