
>> वैद्य सत्यव्रत नानल
आपल्या देशात आजपर्यंत अनेक वंशांचे लोक आणि अनेकविध पदार्थ देशांबाहेरून आले किंवा आणले गेले. आपण लोकांचेच नाही, तर पदार्थांचेही मनापासून स्वागतच केले. देशवासीयांच्या गळ्यातील मोती बनलेला आणि प्रत्येक घरात आपली जागा आपल्या चवीच्या कर्तृत्वावर तयार करू शकलेला पदार्थ म्हणजे कांदा. कच्चा खा किंवा शिजवून खा, कांदा मिसळल्याने पदार्थांमध्ये नवीन चव निर्माण होते. त्यामुळे त्याला देशवासीयांच्या अन्नातून बाजूला करणे अशक्यच आहे. कांद्याचे आयुर्वेदानुसार गुण काय, फायदे काय ते पाहूया. खाण्याचे नियमही समजून घेऊ या.
कांदा चवीला तिखट-गोड, रसदार, पचनास थंड आहे. कफ, मांस आणि शुक्र धातू वाढवणारा आहे. चावून खाताना येणारा करकर आवाज मनाला तरतरी आणणारा असतो. कांदा आवडत नाही असे लोक कमीच सापडतात. धर्मासाठी, अध्यात्मासाठी कांदा न खाणारे बरेच लोक आहेत.
दरवर्षी भाव पडल्याने अब्जावधी रुपयांचा कांदा फुकट जातो. त्यामुळे वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावरही हा कांदा आपली हजेरी लावतो. अशाच वेळी कांदा सुकवून त्याची पूड करून अनेक पंपन्या ती हॉटेल्समध्ये वर्षभर विकतात. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सुकवून केलेली पूड सर्रासपणे वापरली जाते. आपल्या देशातून असे अनेक पदार्थ सुकवून बाहेर देशात निर्यातही केले जातात. शेतकरी मात्र याचा फायदा अजून पाहिजे तेवढा उठवू शकलेला नाही. यावर विचार होणे आवश्यक आहे. असो. तो आजचा आपला विषय नाही. आयुर्वेदानुसार कांदा वापरायचा कसा आणि कशासाठी ते पाहूया.
कांदा खाऊन होणारे फायदे
1) अजीर्णामुळे जर भूक लागत नसेल, तोंडात खूप लाळ सुटत असेल तर – एक पांढरा कांदा, एक कोथिंबिरीची काडी आणि एक काळी मिरी दाणा असे चावून खावे. एक दोन दिवसात फायदा होतो.
2) वजन वाढवायचे असेल तर – कांदा लांब लांब कापून तुपावर परतावा. त्यात समप्रमाणात साखर मिसळावी. रोज एक वेळ जेवणासह खावे, महिन्याभरात वजन भरू लागते.
3) लहान मुलांना वारंवार सर्दी किंवा टॉन्सिल सुजणे असेल तर – कांदा वाळूत भाजावा. थंड झाल्यावर मधासह खावा. महिना, दोन महिने सलग केले तर घेतलेल्या औषधांचा टिकाऊ परिणाम मिळतो.
4) छातीत कफ भरून दम लागणे, कफ न पडणे – कांदा रस चार चमचे, आल्याचा रस एक चमचा आणि खडीसाखर एक चमचा एकत्र करून रोज सकाळ-सायंकाळ घ्यावे.
5) संभोग शक्ती कमी असणे, संभोगानंतर चिडचिड, अंगदुखी होणे, वीर्य पातळ होणे – कांदा रस चार चमचे, मध एक चमचा, गावठी अंडे एक कच्चे असे एकत्र करून रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. त्यानंतर दोन तासाने दूध एक ग्लास, जायफळ अर्धा चमचा, एक केशर काडी, खडीसाखर एक चमचा असे एकत्र करून प्यावे. सलग आठ दिवस करावे. या दिवसात संभोग करणे आणि तिखट, कडू आणि खारट पदार्थ खाणे टाळावे. टिकाऊ परिणाम हवे असतील तर यासोबत आपल्या वैद्यांना विचारून योग्य औषधेही घ्यावीत हे जास्त उत्तम.
6) पोटात मळाचे खडे होणे, पोटात वायू धरणे, बरगडय़ा दुखणे – कांदा किसून त्यातील पाणी काढावे. दह्यात हा कांदा, ओवा, जिरे, हिंग, कोथिंबीर, सैंधव मीठ एकत्र करून दुपारी जेवणात खावे.
कांदा लावून (बाह्य) उपयोग
चक्कर, बेशुद्धी – तोंडावर पाणी शिंपडावे आणि एखादा कांदा पह्डून वास द्यावा.
नाकातून रक्त येत असेल तर – कांदा पह्डून वास घ्यावा. रक्त थांबते. कांद्याचा आणि दुर्वांचा रस काढून नाकात टाकला
गार वाऱयाने कान दुखत असेल तर – कांद्याचा रस कोमट करून तीन तीन थेंब कानात सोडावे.
लहान मुलांमध्ये तापाचा डोक्यावर परिणाम होऊ नये म्हणून – कांदा किसून फ्रीजमधे गार करावा, कपाळावर बांधावा.
खरुज, गजकर्ण – हळपुंड कांद्याच्या रसात उगाळून त्याचा पातळ लेप करावा.
डोळे येणे – कांद्याचा ताजा रस एक एक थेंब डोळ्यात सोडावा. उत्तम फायदा होतो.
मार लागणे, मुरगळणे याने येणारी सूज – कांदा रस आणि मोहरी तेल एकत्र करून रस आटवावा. तेलाने मालिश करावे.
थंडी वाजत असेल तर – कांदा पह्डून काखेत ठेवावा. अंग गरम राहते.
…तर कांदा खाऊ नये!
कांदा भरपूर आणि वारंवार खाणे याने कफाचे आणि लघवीचे अनेक विकार होतात.
कच्चा कांदा खाऊन तोंडाला दुर्गंधी सुटते. टॉन्सिलला सूज येते.
कफाचे रोग असणाऱया व्यक्तींनी रात्री भरपूर कच्चा कांदा खाऊ नये.
कान फुटण्याची सवय असलेल्यांनी आगीत/चुलीत भाजलेला कांदा खाऊ नये.
स्वप्नदोष असणाऱया व्यक्तींनी रात्री जेवणात कांदा खाऊ नये.
शीघ्रपतन असणाऱया व्यक्तींनी संभोगापूर्वी जेवणात कांदा खाऊ नये.



























































