वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण, हगवणे कुटुंबीयांचे जेसीबी मशीन जप्त

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी हगवणे माय-लेकावर जेसीबी मशीनच्या व्यवहारात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचे जेसीबी मशीन जप्त केले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली. तसेच कारागृहातून त्यांचा ताबा घेण्यासाठी या प्रकरणात प्रोडक्शन वॉरंट काढण्यात आले आहे.

प्रशांत अविनाश येळवंडे (33, रा. निघोजे, ता. खेड) यांनी 29 मे रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शशांक राजेंद्र हगवणे आणि लता राजेंद्र हगवणे (दोघे रा. भुकूम, ता. मुळशी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लता हगवणे हिच्या नावावर असलेले जेसीबी मशीन प्रशांत येळवंडे यांनी खरेदी करण्याचा व्यवहार ठरला. जेसीबीच्या बँक कर्जाच्या हप्त्याची दरमहा 50 हजारांची रक्कम येळवंडे हे शशांकला देत होते. मात्र त्याने हप्ते न भरता रिकव्हरी एजंटला हाताशी धरून जेसीबी मशीन येळवंडे यांच्याकडून काढून स्वतःच्या ताब्यात घेतले. येळवंडे हे संबंधित रक्कम किंवा मशीनची मागणी करण्यासाठी गेले. त्या वेळी शशांकने पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात येळवंडे यांना 11 लाख 70 हजार रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांचा न्यायालयाकडे अर्ज

सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या शशांक आणि लता हगवणे यांच्या अटकेसाठी महाळुंगे पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंट जारी केले आहे. आर्थिक फसवणूक प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुह्याच्या तपासकामी शशांक आणि लता यांना ताब्यात देण्यात यावे, असा अर्ज महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयाकडे सादर केला आहे.