
कोरोना महामारीच्या संकटामुळे बंद असलेले माता वैष्णोदेवी मंदिर भक्तांसाठी रविवारपासून खुले झाले आहे. मागील पाच महिन्यांपासून स्थगित करण्यात आलेली वैष्णोदेवी यात्राही सुरू करण्यात आली आहे. दर्शनासाठी भक्तांना ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.
देश-विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या वैष्णोदेवी मंदिरात एका दिवसात 50 ते 60 हजार भक्त देवीचे दर्शन घेतात. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ही संख्या मर्यादित करण्यात आली असून एका दिवसात 2 हजार भक्त दर्शन घेऊ शकतील. पहिल्या आठवडय़ात जम्मू-कश्मीरमधील 1900 आणि इतर राज्यांतील 100 भक्तांना दर्शनासाठी परवानगी देण्यात येणार आहे.
श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कुमार यांनी सांगितले की, सुरुवातीच्या काळात मर्यादित भाविकांनाच प्रवेश दिला जाईल. यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. यात्रा खिडकीवरील गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्यात आले असून त्यांनाच दर्शनासाठी परवानगी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या सूचनांचे पालन आवश्यक
मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करणे अनिवार्य
तोंडावर मास्क, फेस कव्हर लावणे बंधनकारक.
सोशल, डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशनकडे विशेष लक्ष द्यावे.
मंदिरात आल्यावर सर्व यात्रेकरूंनी थर्मल क्रीनिंग करावे.
बाहेरील राज्यांतून येणाऱ्यांना कोरोना चाचणी अहवाल आवश्यक.
यांना मंदिरात परवानगी नाही
10 वर्षांखालील मुलांना, गर्भवती महिलांना आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या भक्तांना परवानगी नाही. यासोबतच ज्या लोकांना कोविड-19 शी संबंधित लक्षणे आढळून येतील त्यांनाही दर्शनाची परवानगी नाही.
यात्रा एक दिशा मार्गाने जाईल
माता वैष्णोदेवी यात्रा एक दिशा मार्गाने जाईल. मंदिरात येण्यासाठी भाविकांना कटरा ते भवन हा पारंपरिक मार्ग, बाणगंगा, अधकुवारी व संजीघाट मार्गाचा वापर करता येईल, तर मंदिरातून परतण्यासाठी हिमकोटी व तारकोटे मार्गाचा उपयोग करावा.





























































