
>> जयवंत जोशी
प्रस्तरारोहणात वजीर हे अग्रणी असणाऱया सुळक्यापैकी एक. पाहताच धडकी भरवणारा वजीर बुद्धिमत्ता, प्रस्तरारोहण कौशल्य, आणि शारीरिक क्षमता याची कस लावणारा 165 फुटी सुळका. तेथे पोहचणे म्हणजे एक खडतर प्रवास…
व्यस्त धकाधकीच्या जीवनात प्रस्तरारोहण छंदासाठी मध्यंतरी वेळ देता आला नाही. कोरोना काळात तर सराव थांबला. एखादा दुसरा सुळका सर करावा, ही इच्छा प्रबळ होती.
अशातच तब्बल एक महिन्यानंतर जयपूरवरून आलो आणि मित्र, सहकारी प्रमोद चव्हाण यांनी प्रस्ताव मांडला आपण सुळका सर करावा, तोही ‘वजीर.’ अचानक आलेल्या प्रस्तावाने मी सुखावून गेलो आणि लागलीच होकार दिला. रीतसर शिखर कमिटीला कळवून जय्यत तयारी सुरू केली. काही अडचणी येऊनही साऱया गोष्टी जुळून आल्याच. 23 डिसेंबर रोजी प्रमोद चव्हाण, कार्तिक आयरे, सुजित लाड, प्रथम वडे, शंतनु मोरे, सचिन मोहिते, अंजली परब आणि मी जयवंत जोशी असे आठ जण विनोद आचरेकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या सात आसनी गाडीतून प्रवास करत, वजीरच्या पायथ्याच्या वांद्रे गावातील बबन पेंगवडे यांच्या घराच्या पडविला बोचऱया थंडीच्या कडक्यात विसावलो.
24 डिसेंबर रोजी साहित्याची आणि आणलेल्या शिदोरीची बरोबर वाटणी करून प्रत्येकी 4 लीटर पाण्यासह 6 वाजून 40 मिनिटांनी वजीर शिखराकडे आमची स्वारी निघाली. बबन दादा वाट दाखवायला होतेच. दमछाक करणारी उभी चढण, निसरडी वाट अशा प्रतिकूल परिस्थितीत तोंडातून एकही शब्द न काढता सकाळी 9 वाजून 20 वाजता धडकी भरवणाऱया वजीरच्या पायथ्याला नतमस्तक झालो.
पायथ्याला न्याहरी आणि गरमागरम चहाचा आस्वाद घेत आणखी थोडी प्रस्तरारोहणाची आखणी सुरू केली. सर्वांनी आणलेले साहित्य, कोण काय घेणार, इथपासून कोण काय करणार इथपर्यंत. वजीर सुळक्याला पुन्हा एकदा नतमस्तक होऊन, पूजा करून बरोबर 11 वाजता कार्तिकने आपला सुरक्षा रोप प्रथमच्या हातात देऊन चढाईस सुरुवात केली. दोघांच्या सुंदर मिलापाने आणि सुजित आणि शंतनु यांच्या सहकार्याने आपले प्रस्तरारोहणाचे काwशल्याचे प्रदर्शन करीत 60 अंश/70अंश कोनातील वजीर दुपारी 2.39 ला सहज आरोहण केले. यात प्रमोदचा दांडगा आत्मविश्वास आणि नियोजन, वजीर सुळका लीड केलेल्या अंजली मॅडम यांचे मार्गदर्शन, सचिन मोहिते याची अचानक मिळालेली साथ आणि मी सर्व टेक्नीकल बाबींची धुरा सांभाळत अतिशय कठीण प्रथम श्रेणीतील वजीर सर करण्यात यश मिळाले.
त्यानंतर एकेक करून सुळक्यावरून सांगितल्याप्रमाणे सुरक्षित उतरलो आणि वाईंडअपची धुरा सांभाळत कार्तिक जेव्हा जमिनीवर आला, तेव्हा नकळतच आनंदाश्रू आले आणि स्वामींचे आभार मानले. माझ्या आनंदला पारावार नव्हता. अखेर योग जुळून आला.
आणलेल्या शिदोरीवर सर्वांनी यथेच्छ ताव मारत तृप्तीचा ढेकर दिला. सर्व सामानाची जमवाजमव करीत प्रत्येकाने आपापल्या बॅग भरल्या. निसरडय़ा वाटेवर कसरत करीत, एकमेकांची काळजी घेत वांद्रे गावात बबनच्या घराच्या पडवीला रात्री 8.20 ला विसावलो. थंडगार वातावरणात बबन दादाने बनविलेल्या चहाचा घोट घेत साहित्याची पाहणी करत, मोजणी करून बॅगा गाडीत काsंबल्या आणि सुख-दुःख आठवणींसह परतीचा प्रवास सुरू केला.


























































