वंचित बहुजन आघाडीचा सीएएला विरोध; बंद संमिश्र

516

नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून काहीठिकाणी हिंसाचार झाला आहे. दरम्यान ”वंचित बुहजन आघाडीने पुकारलेला बंद यशस्वी झाला आहे. जनजीवन सुरळीत व्हावे यासाठी महाराष्ट्र बंद मागे घेत आहे”, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. आम्ही बंदसाठी कोणावरही जबरदस्ती केली नाही तसेच हिंसाचारही केलेला नाही असा दावा त्यांनी केला.

या बंददरम्यान हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे. मात्र, बंदमध्ये कोणताही हिंसाचार झाला नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. तसेच अमरावतीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांवर झालेला लाठीमार चुकीचा असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आमच्या कार्यकर्त्यांना सोडून दिले, असेही त्यांनी सांगितले. घाटकोपरमध्ये बसवर झालेली दगडफेक आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली नाही. दगडफेक करणारे चेहरा झाकून आले होते. दगडफेक केल्यानंतर ते पळून गेले. मुंबईतील दादरमध्ये कपडा बाजार आहे. या बाजारात दररोज काही कोटींचा व्यवहार होतो पण शुक्रवारी 50 कोटींचाही व्यवहार झालेला नाही असा दावा त्यांनी केला.तसेच काही ठिकाणी हिंसाचार होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आपण कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते, असेही ते म्हणाले.

ठाण्यामध्ये तीन हात नाका चौकात ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांनी रस्ता अडवला होता. तर शीवमध्ये आंदोलकांनी रास्ता रोको केला होता. गोवंडीतही आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चेंबूरमध्ये बसवर दगडफेक करण्यात आली. अमरावतीच्या इर्विन चौकात वंचितच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्यामुळे दुपारी 1 वाजता पोलिसांना लाठीमार करावा लागला.पुण्यात दांडेकर पुलावर रास्ता रोको करण्यात आला होता. संभाजीनगरमध्येही सिटी बसवर दगडफेक करण्यात आली. नाशिकमध्ये शांततेत आंदोलन करण्यात आले.सोलापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. परभणीत सीएएविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. शिरोळ तालुक्यात जयसिंगपूर,शिरोळ, कुरुंदवाड व परिसरातील उदगांव, निमशिरगांव, धरणगुत्ती, तमदलगे, नांदणीसह शिरोळ तालुक्यात दुपारपर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार पुर्ववत केले. जळगावमध्ये आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. तर अकोल्यात भाजप आमदार आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. धाराशीवमध्येही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. नांदेड, सांगली, बारातमतीत शांततेत आंदोलन करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या