‘वंदे भारत’ ताशी 160 किमी वेगाने धावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरात धावणाऱया वंदे भारत ट्रेन लवकरच ‘मिशन रफ्तार’अंतर्गत ताशी शंभर किलोमीटर वेगाने धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात पश्चिम रेल्वे मार्गावर मुंबई- अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. त्यासाठी रेल्वे रुळाची वेग मर्यादा क्षमता आणि इतर बाबींच्या अद्यावतीकरणासाठी 3 हजार 959 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र सरकारकडून देशातील अनेक शहरांदरम्यान वंदे भारत रेल्वे सुरू केली आहे. ताशी 160 किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता असूनही रेल्वे ट्रकची क्षमता कमी असल्याने या गाडय़ा जास्तीत जास्त ताशी 110-130 किलोमीटर वेगाने चालवल्या जातात. त्यामुळे प्रवासाला सध्याच्या मेल-एक्प्रेस गाडय़ांएवढाच किंवा त्यापेक्षा थोडा कमी वेळ लागतो, मात्र तिकिटाचे पैसे जास्त मोजावे लागतात. त्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जाते. त्या पार्श्वभूमीवर रेल्वेने वंदे भारत गाडय़ांचा वेग वाढवण्यासाठी ‘मिशन रफ्तार’ अंतर्गत वेग वाढवण्यासाठी काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेंतर्गत मुंबई-वडोदरा-अहमदाबाद आणि सुरत-वडोदरा – दिल्ली या दोन रेल्वे मार्गाची वेग मर्यादा वाढणार आहे.

वेळ वाचणार
वंदे भारत ट्रेनचा वेग ताशी 110-130 वरून 160 किलोमीटर पर्यंत वाढणार आहे. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद वंदे भारत ट्रेनच्या प्रवासात 40-50 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. तर सुरत-दिल्ली या रेल्वे प्रवासाचाही वेळ कमी होऊ शकणार आहे. दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गाची वेग मर्यादा वाढणार आहे. त्यामुळे रुळांच्या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंत उभारणे किंवा लोखंडी तारा लावण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडण्याच्या घटना, गुरे रेल्वे मार्गावर येण्याच्या घटना रोखता येणार आहेत.