
सामना ऑनलाईन । वाराणसी
वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणारे तेजबहादूर यादव यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. लष्कराने केलेल्या निलंबनाच्या कारवाईबाबत प्रतिज्ञापत्रांमध्ये योग्य कारण न देऊ शकल्याने तेजबहादूर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे तेजबहादूर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
Samajwadi Party candidate Tej Bahadur Yadav’s nomination for Varanasi rejected, he says, “will go to Supreme Court.” pic.twitter.com/t6asrStAyC
— ANI UP (@ANINewsUP) May 1, 2019
बीएसएफ जवानांचे हाल उजेडात आणणारे निलंबित सैनिक तेजबहादूर यादव यांनी वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात उमेदवारी दाखल केली होती. आधी अपक्ष म्हणून लढणाऱ्या तेजबहादूर यांना समाजवादी पक्षाने तिकीट दिले. उमेदवारी अर्ज दाखल करताना तेजबहादूर यांनी 2 प्रतिज्ञापत्र सादर केली होती.
24 एप्रिल रोजी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत असताना यादव यांनी भ्रष्टाराचाच्या आरोपांमुळे आपल्याला सैन्यातून निलंबित केल्याचं म्हटलं होतं. समाजवादी पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर यादव यांनी 29 एप्रिल रोजी नव्याने प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी निलंबनाबाबतची माहिती लपवल्याचा आरोप केला गेला. याच मुद्दावरून आक्षेप घेतल्याने तेजबहादूर यादव यांना या प्रकरणी उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले. बुधवारी यावर सुनावणी झाली. निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकरणी निर्णय देताना त्यांची उमेदवारी रद्द केली.
सर्वोच्च न्यायालयात जाणार -तेजबहादूर
दिलेल्या निश्चित वेळेमध्ये निवडणूक आयोगाने मागवलेले कागदपत्रं सादर न करू शकल्याने उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने तेजबहादूर यांना सांगितले आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे तेजबहादूर यांच्या वकिलांनी स्पष्ट केले.
Rajesh Gupta, Tej Bahadur Yadav’s lawyer: We had submitted the evidence that was asked from us. Still, the nomination was declared invalid. We will go to the Supreme Court. pic.twitter.com/erLdG6N7up
— ANI UP (@ANINewsUP) May 1, 2019



























































