
>> वर्णिका काकडे
कोंकणी ही भारताच्या पश्चिम किनारी कोकण पट्टय़ात बोलली जाणारी एक इंडो-युरोपीय भाषा आहे. ही गोवा राज्याची अधिकृत राजभाषा असून, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गुजरातच्या काही भागांतही ती विविध बोलीभाषेच्या रूपात बोलली जाते. मराठीला गोव्यात समकक्ष दर्जा आहे. अनुस्वार हा कोंकणी भाषेचा श्वास आहे. अत्यंत समृद्ध अशी ही भाषा असून तिचे मूळ संस्कृत आणि प्राकृत भाषेशी जोडलेले आहे.
भौगोलिक स्थानानुसार कोंकणीत विविधता आगोव्यात ‘बार्देशी’, ‘फोंडी’ अशा विविध बोली बोलल्या जातात. महाराष्ट्राच्या कोकण विभागात ‘मालवणी’ ही कोंकणीचीच एक प्रमुख बोली मानली जाते. कोंकणी ही एकसंध बोलीभाषा नसून तिच्यात एकूण आठ प्रकार गणले जातात. गोव्यात बोलली जाणारी गोव्याची कोंकणी ही त्यांपैकी एक असून तिच्यात ख्रिश्चनांची कोंकणी व हिंदूंची कोंकणी असे दोन प्रकार आहेत. ख्रिश्चनांच्या कोंकणीवर पोर्तुगीज भाषेचा प्रभाव आहे.महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्रात बोलली जाणारी कोंकणीही वेगळी आहे. शिवाय मालवणी, चित्तपावनी, वारली, काणकोणी, डांगी वगैरे अन्य बोलीभाषा कोंकणीच्या उपभाषा आहेत. या सर्व बोलीभाषा बोलणाऱयांची एकूण लोकसंख्या सुमारे 98 लाखांहून अधिक आहे. पूर्वी कोकणी लिहिण्यासाठी कर्नाटकात कानडी, तर केरळीय कोकणी लोक मल्याळी लिपी वापरत असत. आता मात्र सर्वत्र देवनागरी लिपीतून कोंकणी लिहिली जाते. गोवा आणि महाराष्ट्रात देवनागरी लिपीचा वापर होतो. गोव्यात रोमन लिपीसुद्धा वापरतात.
इंडो-आर्यन भाषांत ही सर्वांत दक्षिण टोकाकडील भाषा आहे. तिचे नाते मराठी आणि गुजरातीशी आहे. केरळमध्ये आणि कर्नाटकात बोलल्या जाणाऱया कोंकणी भाषेत द्रविड भाषांतले अनेक मूळ शब्द आहेत. कोंकणी भाषेचे व्याकरण मराठी भाषेच्या जवळ जाणारे असले तरी, ते तंतोतंत मराठी भाषेचे व्याकरण नाही. कोंकणीमध्ये (दीर्घ स्वर सोडून) 16 स्वर आणि 36 व्यंजने आहेत. प्रत्येक स्वर नाकात उच्चारला जातो. कोंकणीतला ‘अ’चा उच्चार मराठीतल्या ‘अ’च्या उच्चारापेक्षा वेगळा आहे. तसेच ‘ए’ या स्वराचे तीन उच्चार आहेत.
गोव्यामध्ये सुनापरांत हे कोंकणी दैनिक दीर्घकाळ प्रकाशित होत होते. त्यानंतर आता भांगरभूंय हे देवनागरी कोंकणी दैनिक, गोंयकार हे कोंकणी भाषेतील पहिली आणि एकमेव न्यूजसाईट तसेच युटय़ुब चॅनेल आहेत. या व्यतिरिक्त गोव्यामध्ये रोमन कोंकणीमध्ये आमचो आवाज, वावरडय़ांचो इष्ट ही साप्ताहिके प्रकाशित होतात. तर बिंब आणि गोंयकाराक जाग हे देवनागरी कोंकणीमध्ये साहित्यिक मासिके प्रकाशित होतात.






























































