
23 नोव्हेंबरपासून नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय त्या-त्या जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने घ्यावा, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची परिस्थिती वेगवेगळी आहे. या परिस्थितीचा अंदाज घेऊनच जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करायच्या आहेत तसेच शाळा सुरू करत असताना शाळांचे सॅनिटायझेशन, शिक्षकांची कोरोना चाचणी आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊनच निर्णय घ्यायचा आहे.
मुंबईत दिवाळीत झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतला आहे. मुंबईप्रमाणे पुणे, नाशिक व इतर जिल्ह्यांची परिस्थिती वेगवेगळी आहे. नाशिक जिल्ह्यातील शाळांचे सॅनिटायझेशन पूर्ण झाल्याचे तेथील आयुक्तांनी सांगितले आहे. आता 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय त्यांनी योग्य ती खबरदारी घेऊनच घ्यायचा असल्याचेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील शिक्षकांची 50 टक्के उपस्थितीची अट रद्द करा
मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यत बंद असणार आहेत. त्यामुळे येथील शिक्षकांची 50 टक्के उपस्थितीची अट रद्द करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. तसेच ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शाळाही बंद ठेवण्यात याव्यात अशी मागणीही शिक्षक संघटनांनी केली आहे. तसेच अनेक शिक्षक संघटनांनी मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
- कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्हय़ातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी एकत्रित निर्णय घ्यायचा आहे. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरूच राहणार आहे.
- ज्या जिल्ह्यांमध्ये 31 डिसेंबरपर्यत शाळा बंद असतील त्या जिल्ह्यात दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार आहेत.























































