
महापालिकेतील 90 हजार कोटींच्या बँक ठेवी लुटून खाणारे, मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणची हजारो एकर जमीन लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालणारे, बेस्टचे खासगीकरण करणारे भाजप आणि शिंदे हे मुंबईकरांचा विकास करणार नाहीत. भाजप महायुतीचा जाहीरनामा नाही तर तो ‘फेकूनामा’ आहे, अशी घणाघाती टीका मुंबई काँग्रेस अध्यक्षा-खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना म्हणाल्या, मागील 3 वर्ष 9 महिने प्रशासकाच्या मदतीने मुंबई महापालिकेचा कारभार मंत्रालयातून सुरू आहे. सर्व फाईल्स नियमबाह्य पद्धतीने मंत्रालयातून मंजूर केल्या जात आहेत. बेस्ट बसला मोडीत काढण्याचे षड्यंत्र आहे तर महापालिकेच्या शाळाही खासगी संस्थांना दिल्या जात आहेत. पिण्याचे स्वच्छ व पुरेसे पाणी मिळत नाही. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई होते. मिठी नदीच्या गाळातही भ्रष्टाचार केला आहे. सत्ताधारी पक्षाने स्वतःच्या वॉर्डात मात्र घरचा पैसा असल्यासारखा वाटला आहे, असा टोला गायकवाड यांनी लगावला.
धारावी, कोळीवाडय़ांवर भाजपची वाकडी नजर
मुंबईतील 3 ते 4 हजार एकर जमीन अदानीला किरकोळ भावाने व सर्व नियम बदलून दिल्या आहेत. धारावीकरांना धारावीतून हाकलून लावण्याचे षड्यंत्र आहे, कोळीवाडय़ांवर भाजपची वाकडी नजर आहे, एसआरएच्या नावाखाली महत्त्वाचे भूखंड बगलबच्च्यांना दिले आहेत, अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली.
स्वतःचा 2017 चा जाहीरनामा एकदा तपासून पाहा
महायुतीचा 2026 च्या मुंबई महानगरपालिकेसाठीचा वचननामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. या वचननाम्याचा काँग्रेसने चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपने 2017 मधील स्वतःचा जाहीरनामा पाहण्याची तसदी घ्यावी. चार वर्षे प्रशासकाच्या माध्यमातून सत्ता असताना काय केले, असा सवाल काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी ‘एक्स’वर पोस्ट टाकून फडवणवीस यांना ‘सपनो का सौदागर’ म्हणत टीका केली. सचिन सावंत यांनी भाजपच्या 2017 मधील जाहीरनाम्याची काही छायाचित्रे टाकून फडवणवीस यांना प्रश्न केले आहेत. काही आश्वासने आम्ही आठवण करून देत आहोत.





























































