
पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्सोहान देण्यासाठी सरकारने पूर्णपणे EV वाहनांना टोल माफीची घोषणा केली होती. तरीही EV वाहनांचा टोल कापला जात आहे. त्यामुळे EV मालक त्रस्त असून हा मुद्दा आज (10 डिसेंबर 2025) विधानसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार वरुण सरदेसाई यांनी मांडला. आणि या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
वरुण सरदेसाई विधानसभेत म्हणाले की, “23 जून 2025 EV टोलमाफीचा जीआर काढण्यात आला आणि 22 सप्टेंबर 2025 रोजी त्याची अंमलबजावणी होऊन 100 टक्के टोल माफी करण्यात आली. परंतू माझ्याकडे टोल कट झाल्यानंतर ज्या रिसीट येतात, त्या रिसीट आहेत. त्या रिसीटमध्ये EV गाडीचं फास्टॅग आहे.” असं म्हणत त्यांनी सरकारची पोलखोल केली आहे.
ते पुढे म्हणाले की, “सी-लिंकला 27 ऑक्टोबर 2025 रोजी टोल कापला गेला आहे. 21 ऑक्टोबर 2025 रोजी समृद्धी महामार्गावर टोल कापला गेला आहे. म्हणजे छापील उत्तर काय आहे तर, 22/08/2025 नंतर EV ची टोल माफी झाली आहे. परंतू माझ्याकडे टोल कट झाल्याच्या रिसीट आहेत. मी त्या रिसीट द्यायला तयार आहे. एक रिसीट माझ्याकडे आलेली आहे. अशा हजारो EV मालकांची सरकारकडून फसवणूक होतीये. एकतर टोल ऑपरेटर फसवणूक करतायत किंवा सरकार EV मालकांची फसवणूक करत आहे. यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वरुण सरदेसाई यांनी केली आहे.



























































