ऐतिहासिक वसई किल्ल्यात आगडोंब, गर्दुल्ल्यांचा प्रताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ऐतिहासिक वसई किल्ल्यात बसणाऱ्या दारुडय़ा व गर्दुल्ल्यांच्या प्रतापाने येथील खजुरांची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सोसाटय़ाचा वारा, सुकलेले गवत व मोकळ्या परिसरामुळे आग किल्ल्याच्या विविध परिसरात वेगाने पसरली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी पोहोचत ही आग विझवली.

वसई किल्ल्यात सोमवारी उशिरा रात्री प्रवेश करणाऱ्या मुख्य दरवाजाजवळील खजुरांची झाडे पेटली. या ठिकाणी आधी सुक्या गवताने पेट घेतल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप घेतले. आगीचे गांभीर्य लक्षात घेता स्थानीक ग्रामस्थांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. वसई-विरार महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी पोहोचत आग विझवली. मात्र तरीही अनेक खजुराच्या झाडांना आगीची झळ पोहोचली. ही आग किल्ल्यात बसणारे दारुडे व गर्दुल्ल्यांकडून लावल्याची शक्यता व्यक्त होत असून या घटनेने किल्ल्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शिळफाटय़ाजवळ सात गोदामे पेटली 

ठाणे शिळफाट्याजवळील खान कंपाऊंड येथील सात गोदामांना रात्री भीषण आग लागली. आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत गोदामे जळून खाक झाली होती. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून चार वॉटर टँकर, दोन जम्बो वॉटर टँकर, दोन रेस्क्यू व्हॅन तसेच आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या नियोजनाने आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग इतकी भीषण होती की आज सकाळपर्यंत कुलिंगचे काम चालू होते.