सामना प्रतिनिधी। वसई
दिवाळखोरीत निघालेल्या जेट एअरवेजने कर्मचाऱयाचा शनिवारी पहिला बळी घेतला. जानेवारीपासून पगार थकला, मग नोकरी गेली आणि त्यातच कॅन्सरच्या उपचारासाठी पैसे नसल्याने नैराश्य आलेल्या शैलेश सिंग यांनी नालासोपाऱयात इमारतीच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे जेट कर्मचाऱयांमध्ये खळबळ उडाली आहे.
नालासोपारा येथे राहणारे 53 वर्षीय शैलेश सिंग हे कॅन्सरमुळे गेल्या काही महिन्यांपासून त्रस्त होते. त्यामुळे उपचारासाठी त्यांनी रजा घेतली होती. त्याच दरम्यान जेट एअरवेज दिवाळखोरीत निघाली आणि एका फटक्यात 16 हजार कर्मचाऱयांवर बेकारीची कुऱहाड कोसळली. जानेवारीपासून या सर्व कर्मचाऱयांचे पगार थकले आहेत. या आर्थिक आणीबाणीला शैलेश सिंगही तोंड देत होते. एकीकडे नोकरी गेली तर दुसरीकडे कॅन्सरच्या आजारासाठी आर्थिक चणचण यामुळे निराश होऊन अखेर त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली असल्याचा आरोप जेट एअरवेज कर्मचारी संघटनेने केला आहे. दरम्यान या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अपघाती निधनाची नोंद करण्यात आली आहे. शैलेश सिंग यांचा मुलगाही जेट एअरलाइनमध्येच काम करतो.























































