29 प्रभाग, 115 सदस्य; वसई-विरार पालिकेचा प्रभागरचना प्रारूप आराखडा जाहीर

>> मनीष म्हात्रे

मागील पाच वर्षांपासून रखडलेल्या वसई-विरार पालिकेच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली होती. पालिकेने प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा शासनाला सादर केल्यानंतर तो मंजुरीसाठी नगरविकास मंत्रालयाकडे गेला होता. शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी अखेर वसई-विरार पालिकेचा प्रभागरचना प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आल्यामुळे आता निवडणूक होणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

पाच वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार प्रभागरचना प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश निवडणूक आयोग आणि शासनाकडून संबंधित यंत्रणांना देण्यात आले होते.महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ करिता प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्ट, २०२५ रोजी प्रसिध्द करण्याचे निर्देश दिलेले होते. सदरची प्रभाग विभाग प्रारूप प्रभाग रचना पालीका मुख्यालयासह १० ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे. यावर आता नागरीकांना हरकती व सूचना दाखल करता येणार असून ४ सप्टेंबर पर्यंत पालिकेत हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने प्रभागांची रचना कशा प्रकारे करण्यात यावी, यासंदर्भात परिपत्रक काढून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना कळविले होते. वसई विरार महापालिका क वर्गामध्ये मोडत असल्याने येथील प्रभागांची रचना महापालिका आयुक्तांकडून केली गेली आहे.

निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार वसई-विरार पालिकेने आरक्षित प्रभागांची जाहीर सोडत यापूर्वी २१ मे २०२२ रोजी काढली होती. प्रभागनिहाय आरक्षण प्रसिद्ध करून त्यावर १ जून ते ६ जून २०२२ या कालावधीमध्ये हरकती व सूचना मागविण्यात आल्या. त्यानंतर १३ मे २०२२ रोजी पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली. त्या वेळी सदस्य संख्या ११ ने वाढवून १२६ करण्यात आली होती. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी जागांचा मुद्दा निवडणुकीसाठी निकाली निघाला आहे.

बिगुल वाजले… प्रभागरचना जाहीर बिगुल वाजले… प्रभागरचना जाहीर; मुंबई महापालिकेचे 227 वॉर्ड जैसे थे!

त्याचप्रमाणे चार सदस्यांचा एक प्रभाग अशाप्रकारे २०१७मध्ये प्रभागांची रचना करण्यात आली. त्याचप्रमाणे प्रभागरचना प्रारूप आराखडा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे वसई-विरार पालिकेच्या निवडणुकीसाठी २९ प्रभागांची रचना करण्यात आली असून, प्रारूप आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला होता. २८ प्रभागांत चार नगरसेवक तर २९व्या प्रभागात तीन अशाप्रकारे २९ प्रभागांत ११५ नगरसेवकांसाठी वसई-विरार महापालिकेची निवडणूक होणार आहे. महापालिकेकडून पाठविण्यात आलेल्या प्रभागरचना प्रारूप आराखड्याला २२ ऑगस्टला निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, २०१७मध्ये असलेली नगरसेवकांची संख्या तेवढीच राहणार असली तरी या वेळी २८ प्रभाग हे चारचे असून, एक प्रभाग हा तीनचा असणार आहे.